आसमा सन्मान पुरस्काराने चौदा माध्यमकर्मींचा झाला गौरव
राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा : चांगल्या कामाची घेतली दखल
कोल्हापूर : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ॲडव्हर्टाईज एजन्सी ॲन्ड मीडिया असोसिएशन आणि फेम या संस्थेमार्फत शुक्रवारी दि.१४ ऑक्टोबररोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांतील चौदाजणांना आसमा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांतील विविध मान्यवर एकवटले. यानिमित्ताने माध्यम क्षेत्रातील चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात आली.
‘पुढारी’चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, ‘सकाळ’ चे ब्युरो चीफ निवास चौगुले, ‘लोकमत’चे वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ‘तरुण भारत’चे सिनियर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रणजित कणसे, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे सहाय्यक व्यवस्थापक अमोल पाटील, ‘पुण्यनगरी’चे जाहिरात प्रतिनिधी ज्ञानेश पाटील, ‘टोमॅटो एफएम’चे मार्केटिंग मॅनेजर मयूर तांबेकर, ‘रेडिओ मिरची’चे ग्रुप मॅनेजर राहुल गजबर, ‘रेडिओ सिटी’चे सिनिअर सेल्स असोसिएट सम्राट भोसले, ‘बिग एफएम’चे सेल्स हेड अमित शरद दंताळ, ‘आकाशवाणी’चे प्रवीण चिपळूणकर, ‘चॅनेल बी’चे वरिष्ठ प्रतिनिधी बाळासाहेब कोळेकर, ‘एस न्यूज’चे जाहिरात विभागप्रमुख सूरज शिंदे यांचा यावेळी गौरव झाला. सविता नाबर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
‘आसमा’चे अध्यक्ष सुनील बासरानी यांनी स्वागत केले. ‘जाहिरात आणि माध्यमांचे स्वरूप’ या विषयावर या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘फेम’चे अध्यक्ष महेश कराडकर, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, संजीव चिपळूणकर आदी मान्यवर व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात शशिकांत पोवार, मयूर तांबेकर,श्रीराम जोशी, अमोल पाटील या सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. विवेक मंद्रूपकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘आसमा’चे खजानिस राजाराम शिंदे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून आसमामार्फत शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांतील व्यक्तींना आसमा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आसमाचे राजाराम शिंदे, संजीव चिपळूणकर, सुनील बासरानी, ‘फेम’चे महेश कराडकर, पी. एस. कुलकर्णी उपस्थित होते.