प्रबोधन वाचनालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न
इचलकरंजी ता. १६, अतिशय गरीब परिस्थिती असलेले डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे शालेय जीवनात वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम करत होते. कष्टातून ,ध्यासातून, वाचनातून संपन्न बनलेले हे थोर व्यक्तिमत्त्व भारताचे राष्ट्रपती होते,जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होते. सर्वसामान्यातून असामान्य बनण्याची किमया त्यांनी वाचनाने साध्य केली होती. ती वाचन प्रेरणा आपण घेतली पाहिजे.वाचन संस्कृती विकसित करणे म्हणजे स्वतःला व कुटुंबाला उन्नत करणे असते. त्यामुळे प्रत्येक सुशिक्षित नागरीक बंधू भगिनींनी सार्वजनिक वाचनालयाचे सभासद- वाचक झाले पाहिजे. किमान एक वृत्तपत्र व पुस्तक घरात वाचनासाठी उपलब्ध असले पाहिजे. त्याद्वारे आपले कुटुंब, समाज व राष्ट्र बलशाली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.तीच कालवश डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना खरी आदरांजली ठरेल असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास कोळी यांनी व्यक्त केले. ते प्रबोधन वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करतांना बोलत होते.प्रारंभी माजी राष्ट्रपती व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कालवश डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या एक्याण्णव्या जन्मदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते सुरेश चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या ग्रंथ प्रदर्शनामध्ये प्रबोधन वाचनालयातील विविध विभागातील नवी पुस्तके मांडण्यात आली आहेत. तीस हजारांहून अधिक उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह असलेल्या प्रबोधन वाचनालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी केले. या ग्रंथ प्रदर्शनाला अनेक साहित्य रसिकांनी भेट दिली.यावेळी अंनिसचे ज्येष्ठ विज्ञानवादी कार्यकर्ते व लेखक -संपादक प्रा.प.रा.आरडे यांना आदरांजली वाहण्यात आली.