स्वातंत्र्य का व कशासाठी याची क्रांतीअग्रणी जी. डी. बापूंची स्पष्ट कल्पना होती——प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्य का व कशासाठी याची क्रांतीअग्रणी जी. डी. बापूंची स्पष्ट कल्पना होती——प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्य का व कशासाठी याची क्रांतीअग्रणी जी. डी. बापूंची स्पष्ट कल्पना होती

——-प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर ता. ०९ , स्वातंत्र्य का व कशासाठी मिळवायचे आहे याच्या संकल्पना स्पष्ट असलेल्या क्रांतिअग्रणी जी डी बापूंनीआपल्या ऐन तारुण्यात स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा सहभाग दिला.तसेच स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनाची सर्वसमावेशक विचारधारा व संविधानाची मूल्यव्यवस्था राबविण्यासाठी विविध क्षेत्रात अनमोल स्वरूपाचे काम केले.स्वातंत्र्याची फळे समाजाच्या शेवटच्या माणसांना चाखता आली पाहिजेत.त्यांची उन्नत्ती झाली पाहिजे यासाठी क्रांतीअग्रणी अखेरपर्यंत कार्यतर राहिले.तो विचार घेऊन पुढे जाणे महत्वाचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या जयसिंगपुर शाखेच्या वतीने क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ.चिदानंद अवळेकर होते. एफ. वाय.कुंभोजकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले , भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात प्रतिसरकारने एक महत्वाची भूमिका बजावली.ब्रिटिश साम्राज्यशाही प्रमाणेच एतद्देशीय गुन्हेगारी, दरोडेखोरी ,सावकारी, विघातक विकृती विरुद्ध लढण्यासाठी साताऱ्यात प्रतिसरकारची जून १९४३ मध्ये स्थापना झाली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात साताऱ्याचे
प्रतिसरकार हे एक तेजस्वी पर्व होते.त्या प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी बापू लाड यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली.ते आघाडीवरील योद्धे होते. मध्यवर्ती युद्धमंडळ, न्यायदान मंडळ, लष्करी प्रशिक्षण केंद्र, जनता कोर्ट, तुफान दल,आघात दल, चवळीसाठी निधी उभारण्यासाठी खजिना लूट, दारूबंदी ते अस्पृश्यता निर्मूलन अशा अनेक माध्यमातून जी.डी.बापूंनी जे काम केलं ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रसाद कुलकर्णी पुढे,म्हणाले, अतिशय संघर्षशाली जीवन क्रांतीअग्रणी बापू जगले.एक धगधगता इतिहास त्यानी निर्माण केला.क्रांतीच्या मशालीने साम्राज्यवादी अंधार दूर करण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत अग्रणीपणे ते करत राहिले.देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालेल्या बापूंची ‘महाराष्ट्राचे शिल्पकार ‘ या मालिकेतही आदराने नोंद घेतली जाते. सर्वसामान्य जनतेसाठी सरकारने कशी धोरणे राबवली पाहिजेत याचे उदाहरण स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकारच्या माध्यमातून ,स्वातंत्र्य आंदोलनातून आणि स्वातंत्र्योत्तर काळात,शेती,पाणी,शिक्षण,सहकार, कष्टकरी, कामगार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अफाट कार्यकर्तृत्वातून बापूंनी दाखवून दिले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. चिदानंद आवळेकर म्हणाले ,क्रांतीअग्रणी जी. डी. बापू यांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधी आणि इथल्या सावकारशाही व धर्मांध विचारधारे विरोधी केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.संघीय विचारधारा ज्यावेळी ब्रिटिशांची लागूंचालन करत होती त्यावेळी जी. डी. बापू सारखे देशभक्त लढवय्ये देशासाठी प्राण हातात घेऊन लढत होते.तो वसा आणि वारसा आपण पुढे नेण्याची गरज आहे. यावेळी के.एस. दानवाडे, ऍड. संभाजी जाधव, कॉ.रघुनाथ देशिंगे, ऍड.गणेश साळुंखे, राजेंद्र खिलारे, ए.एस. पाटील, अशोक शिरगुप्पे, रवी सावंत ,चंद्रकांत गुरव, नजीर चौगुले,बी.ए. कऱ्याप्पा आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *