प्रवासी भारतीय दिन आणि गांधीजी

प्रवासी भारतीय दिन आणि गांधीजी

प्रवासी भारतीय दिन आणि गांधीजी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९०)

९ जानेवारी या दिवसाचा आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे.कारण याच दिवशी म्हणजे ९ जानेवारी १९१५ रोजी बॅ.मोहनदास करमचंद गांधी अर्थात नंतरचे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील दोन दशकांच्या यशस्वी लढ्यानंतर भारतात परतले होते.त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केलं. १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनात गांधीजींनी अखेरचा एक तृतीयांश काळ या लढ्याचे नेतृत्व केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकत्याच साजरा केला. त्या आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पण दुर्लक्षित ठरलेला हा दिवस आहे. कारण या दिवसाने दक्षिण आफ्रिकेत असलेल्या गांधीजींना भारतात आणलेले होते. कालवश अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना २००३ सालापासून भारत सरकारच्या परदेश व्यवहार मंत्रालयाच्या वतीने हा दिवस ‘ प्रवासी भारतीय दिन ‘म्हणून साजरा केला जातो. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून आलेला हा दिवस भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी तसेच परदेशातील भारतीय समुदायाची भारत सरकारशी संलग्नता मजबूत करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या मुळाशी जोडण्यासाठी साजरा केला जातो. त्याचबरोबर अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले योगदान लक्षात घेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

आज प्रवासी भारतीय दिनाचा मूळ हेतू काहीसा बाजूला पडला आहे असे दिसते.याचे कारण गेल्या दशकभरात देश सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल आठ लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडून दिले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये म्हणजे २०१९ साली १,४४,०१७ ,२०२० मध्ये ८५,२५६ आणि २०२१ मध्ये सखोल १,६३,३७० लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडल्याची आकडेवारी आहे. काहीजणांनी तर इथल्या बँकांना बुडवून ,इथले भांडवल घेऊन सुरक्षितपणे पोबारा केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अलीकडे भारतीय नागरिकत्व का सोडले जाऊ लागले आहे ? पैसे घेऊन सहजपणे पोबारा करणाऱ्यांची संख्या का वाढते आहे ? त्यांना इतके अभय का वाटते आहे ? हा स्वतंत्र विषय आहेच आणि त्याची प्रामाणिकपणे कोणीतरी मांडणीही केली पाहिजे. भारत जागतिक महासत्ता होणार ,भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होणार, भारत विश्वगुरू बनतो आहे ,जग भारताकडे अपेक्षेने बघते आहे हे सारे वारंवार पाहायला ऐकायला लावले जाते. पण नागरिक देश सोडून का जात आहेत? ते कोणत्या आर्थिक वर्गातील जात आहे? काय घेऊन जात आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. तसेच कोरोनापूर्व काळात व नंतर विश्वगुरूंच्या ज्या जागतिक प्रवास परिक्रमा झाल्या त्याचा नेमका भारताला काय फायदा झाला? याचाही शोध घेतला पाहिजे. प्रवासी भारतीय दिनी सजग लोकांनी याचा अभ्यास करावा विचार करावा असे सुचवावेसे वाटते.

आपण आजच्या दिवशी गांधीजींचा दक्षिण आफ्रिकेतील लढा समजून घेऊ. त्याचे महत्त्व आजही मोठे आहे. कारण वंशवादाचा किडा अजूनही काही ठिकाणी वळवळतो आहे. १८९१ मध्ये इंग्लंडमध्ये गांधीजी बॅरिस्टर झाले नंतर .ते लगेचच वकिली व्यवसाय करण्यासाठी भारतात आले. भारतात आल्यावर गांधीजींनी मुंबईच्या न्यायालयात वकील सुरू केली. दीड वर्षे त्यांनी प्रयत्न केले पण त्यांना व्यावसायिक स्थैर्य लाभले नाही. योगायोगाने त्याच वेळी पोरबंदर येथील एका मुस्लिम व्यापाऱ्याने गांधीजींची भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेत चाललेले एका कज्ज्यासाठी त्यांनी गांधीजींना आमंत्रित केले. एक वर्षाच्या कराराने हे आमंत्रण स्वीकारून एप्रिल मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेले.

दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर त्यांना स्वतःला वर्णद्वेषाचे चटके बसू लागले .त्याविरुद्ध त्यांनी तेथे गोऱ्या लोकांच्या वर्णद्वेशी धोरणाविरुद्ध आंदोलन उभे केले. पुढच्या काळात राजकीय स्वातंत्र्यासाठी जे प्रमुख हत्यार गांधीजींनी वापरले त्या सत्याग्रहाचा पहिलाअवलंब त्यांनी तिथेच केला. एका अर्थाने आफ्रिकेतील हा लढा म्हणजे गांधीजींच्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा होता. एक वर्षाच्या कराराने दक्षिण आफ्रिकेत गेलेले गांधीजी तब्बल बावीस वर्षे तेथे संघर्ष करीत राहिले.वर्णद्वेषाचे चटके सोसणाऱ्या तेथील लोकांमध्ये जागृती केली. माणूस म्हणून त्यांना असणाऱ्या त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देऊन अहिंसात्मक कायदेभंग, असहकार ,सत्याग्रह असे मार्ग आक्रमित गांधीजींनी हा लढा जिंकला. आफ्रिकेतील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित ,मजूर अशा विविध धर्म आणि वर्गाच्या लोकांमध्ये त्यांनी आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले.

गांधीजींचे आफ्रिकेतील कार्य आणि तेथील परिस्थिती याबाबत विश्वकोशात म्हटले आहे की,’ दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ सेनापती व सत्ताधारी जनरल स्मटस यांच्याशीच गांधीजींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला.त्यावेळी नाताळ, ट्रान्सव्होल , ऑरेंज फ्री या तीन स्वतंत्र राज्यात हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. हिंदी व्यापारीही तेथे व्यापारासाठी वस्ती करून राहिले होते. नाताळ व ट्रान्सव्होल या राज्यांमध्ये भारतीयांना मताचा अधिकारच नव्हता. ट्रान्सव्होल सरकारने काळ्या लोकांना आपले ओळखपत्र जवळ ठेवण्याची सक्ती केली होती. या ओळखपत्रावर त्यांचे बोटांचे ठसे घेतले जात असत. तसेच भारतीय लोकांवर ‘ पोल टॅक्स ‘ आकारला होता. त्याचे प्रत्येकाला वर्षाला तीन पाउंड भरावे लागत असत.याशिवाय ख्रिश्चन धर्मानुसार न नोंदवलेले सर्व विवाहही बेकायदेशीर ठरवले जात होते .आफ्रिकेतील निग्रो आणि भारतीयांच्या अन्याय विरोधात गांधीजींनी सत्याग्रहाचा लढा सुरू केला. दरबान येथे एक छापखाना सुरू करून जनजागृतीसाठी पत्रके छापून वाटली. १९०४ साली त्यांनी ‘फिनिक्स ‘आश्रम सुरू केला. ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले .’नाताळ इंडियन काँग्रेस ‘या संस्थेची स्थापना करून गांधीजींनी भारतीयांना संघटित केले.

अर्थात दक्षिण आफ्रिकेत मोठ्या संख्येने भारतीय असल्याचे कारण म्हणजे १८५७ नंतर एकीकडे ब्रिटिश राजवट भारतात स्थिरावत होती.तर दुसरीकडे भारतात अनेक भागात सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत होती. इथली परंपरागत राजेशाही, बादशाही आणि नव्याने आलेली ब्रिटिश साम्राज्यशाही लोकांना आधार द्यायला सक्षम ठरली नाही.अशावेळी दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या जमीनदारांना उसासह नवी पिके घेण्यासाठी स्वस्त आणि कुशल मजूर हवे होते .त्यांच्या डोळा भारतीय लोकांवर गेला. त्यांनी सरकारच्या परवानगीने येथील शेतकरी ,शेतमजूर यांना अनेक आश्वासने देऊन दक्षिण आफ्रिकेत नेले. इकडे दुष्काळी स्थिती आणि तिकडे रोजगाराची हमी या आशेने भारतीय शेतकरी, व्यापारी व इतर व्यावसायिक दक्षिण आफ्रिकेत गेले.

ती मंडळी तेथे थोडी स्थिरावल्यावर गोऱ्यांनी त्यांना वंशवादी वागणूक देत छळ मांडला. गांधीजींनी आवाज उठवला होतो तो या अन्यायग्रस्त लोकांसाठी. आणि तेथील अन्यायी,जुलमी राजवटी विरोधात. तेथे सर्वच बिनगोऱ्या लोकांना निग्रोप्रमाणे वागवीत अस्त.तसेच सर्वांनाच कुली म्हणत.गोऱ्या वस्तीत राहण्यास त्यांना प्रतिबंध होता. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादलेले होते. वर्णद्वेशावर आधारलेले नियम मोडले तर गोरे लोक व पोलीस मारहाण करत. गांधीजींनी असा अपमान व मारहाण अनेकदा सहन केली. १८९४ साली तेथील विधिमंडळात हिंदी लोकांच्या सवलती काढून घेणारे अपमानजनक बिल आले. त्यानंतर गांधीजींनी तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प केला.आणि बावीस वर्षांनी तो यशस्वीही केला.

याच काळात गांधीजींच्यावर टॉलस्टॉय,जॉन रस्किन, हेन्री डेव्हिड थोरो यांच्या विचारांचा प्रभाव पडला.टॉलस्टॉयच्या ‘किंगडम ऑफ गॉड ‘मधूनच गांधीजींनी स्वीकारलेली सत्य व अहिंसा ही मूल्य आकाराला आली. तसेच विश्वबंधुताची संकल्पनाही गांधीजींना भावली. ३० मे १९१० रोजी दक्षिण आफ्रिकेत टॉलस्टॉय फॉर्म ची स्थापना गांधीजींनी केली. हा फार्म सविनय प्रतिकाराची तत्त्वज्ञान प्रयोगशाळा बनावा अशी गांधीजींची धारणा होती. हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘ड्युटी ऑफ सिव्हील डीसओबिडीयंस’ या ग्रंथामुळे गांधीजींची असहकार विषयक मते निश्चित झाली. अर्थात दक्षिण आफ्रिकेतील आपल्या सत्याग्रहाच्या लढ्याला थोरोच्या लेखनामुळे सिद्धांतिक बैठक मिळाली असे गांधीजींनी पुढे स्पष्ट केले. ‘अन् टू धीस लास्ट ‘ ते रस्किनचे पुस्तक गांधीजींना अतिशय आवडले होते. त्यांनी त्याच्या ‘सर्वोदय ‘ या नावाने गुजरातीत अनुवादही केला होता. समाजातील सर्वांचे कल्याण तेच आपले कल्याण. सर्वच कष्टकऱ्यांचा सामाजिक दर्जा समानच मानला पाहिजे. शरीर श्रमात जीवनाची सार्थकता आहे .या रस्किनच्या विचारांचा गांधीजींवर प्रभाव पडला.अर्थात टॉलस्टॉय, थोरो व रस्किन यांचे सर्वच विचार गांधीजींना मान्य होते असे नाही. त्यांनी त्याबाबत आपले मतभेद ही व्यक्त केले होते.गांधीजींनी आपल्या अभ्यासातून आणि अनुभवातून लढ्याचा एक मार्ग दक्षिण आफ्रिकेत विकसित केला होता. तो मार्ग घेऊनच ते ९ जानेवारी १९१५ रोजी भारतात आले. आजच्या दिवसाचे महत्व ध्यानात घेतले पाहिजे शेवटी गांधींचा सत्य,अहिंसेचा मार्गच आजच्या फेकुगीरी आणि हिंसेच्या वैचारिक प्रदूषणापासून मुक्त करणारे चांगले पर्यावरण निर्माण करू शकतो.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली तेहतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *