
मिरज, तासगाव व पलूस तालुक्यामधील आयटक बांधकाम कामगार संघटनेचे सभासद असलेले अकरा संघटक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल जाहीर सत्कार!
सांगली निवारा भवन येथे बांधकाम कामगार संघटनेच्या भव्य मेळाव्यामध्ये निवडून आलेल्या अकरा ग्रामपंचायत सदस्यांचा सर्व कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे सरपंच म्हणून गीता बाळासाहेब गायकवाड सर्वपक्षीय पॅनलमधून निवडून आल्या. सरपंच यांच्यासह नऊ आयटक बांधकाम कामगार संघटनेचे संघटक सभासद ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले सदस्य – सुरेखा सुरेश मध्वांना, शोभाताई अजित पाटील, सुजाता दीपक राजोबा, नीलम प्रकाश बंडगर ,सुनीता मारुती चौगुले, संतोष बापू गावडे, अण्णासो किसन गावडे, तासगाव तालुका खुजगाव मधून शोभा हरी पाटील व मिरज तालुक्यातील खटाव येथून अजित खटावकर निवडून आलेले आहेत. या सर्वांचा बांधकाम कामगारांच्या मेळाव्यामध्ये जोरदार स्वागत करून पुष्पगुच्छ व कामगार चळवळीमधील पुस्तिका देऊन सत्कार करण्यात आला.
सांगली जिल्ह्यामध्ये सातत्याने चालू असलेले बांधकाम कामगारांचे आंदोलन वरील सभासद निवडून येण्यामध्ये मदतकारक ठरलेले आहे.
या महत्वपूर्ण बांधकाम कामगार मेळाव्याचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की, जे बांधकाम कामगार ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले आहेत त्यांच्या हातून जनतेची जास्तीत जास्त सेवा होवो व त्यांनी बांधकाम कामगारांना सर्व शासकीय लाभ मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली, तसेच कॉ शंकर पुजारी यांनी सांगितले की अद्याप महाराष्ट्रामध्ये लाखो बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत ते तातडीने निकाली निघणे आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांना घरकुल देण्याची योजना तीन महिन्यापूर्वी जाहीर केलेली आहे परंतु त्याबाबतची कार्यवाही अजूनही संथ गतीने सुरू आहे.
दरम्यान मिरज येथे श्री गोखले बिल्डर यांची भीमपलास घर प्रकल्पामध्ये 43 बांधकाम कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपये अनुदान बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून देण्यात आलेले आहे त्याचेही स्वागत करण्यात आले. उर्वरित 47 बांधकाम कामगारांना दोन लाख रुपये अनुदान आठ दिवसांमध्ये मिळणार आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकूण 400 पेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी घरकुल मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत त्यांचेही काही अर्ज मंजूर झालेला असून त्यांना लवकरच पहिला चेक मिळणार आहे या मेळाव्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांचे आरोग्य तपासणी करणारी संस्था त्यांचे मॅनेजर श्री प्रथमेश संसारे व श्री झांबरे यांनी कामगारांना मोफत आरोग्य तपासणी ची माहिती दिली.माहिती देऊन त्यांनी अशीही तयारी दर्शविलेली आहे की कामगारांच्या गावोगावी जाऊन महत्त्वाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्याचाही लाभ बांधकाम कामगारांनी घ्यावा असे मेळाव्यामध्ये आवाहन करण्यात आले.
सध्या महाराष्ट्र शासनाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याण साठी वीस हजर कोटी रुपये जमलेला आहे. काही योजना मंजूर असूनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही उदाहरणार्थ दोन मुलींच्या पर्यंत मंदिर कामगारांच्या दोन मुलींच्या पर्यंत 51 हजार रुपये विवाहासाठी आर्थिक सहाय्य मिळावे तसेच कोणत्याही वयाच्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये मिळावेत व सर्व थकीत अर्ज एक महिन्यात निकाली काढावेत. या मागण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मुंबई आझाद मैदान येते आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये प्राध्यापिका शरयू बडवे, संतोष बेलदार , रोहिणी कांबळे, सोनाली चव्हाण, विद्या भोरे, स्मिता पाटील, सलीम इनामदार, दीपक परीट, शूभंगी गावडे, दिनेश कोळी यांनी मेळाव्यामध्ये भाषणे केली.