कोणतेही काम अशक्य नाही प्रामाणिक प्रयत्न व कष्ट अंगी असल्यास जीवनाचा सु मार्ग मिळतो आणि यशाचे शिखर गाठता येते हे जयसिंगपूर येथील प्रतिथयश सिव्हिल इंजिनियर शब्बीर आप्पासाहेब फरास यांनी दाखवून दिले आहे
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या म्हनीप्रमाणे
त्यांनी उराशी बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झोकुन देऊन कोणतेही काम करताना मनामध्ये लाज न बाळगता नि संकोचपणे ध्येयपूर्तीसाठी दिवस रात्र कष्ट घेतले आणि अखेरीस त्यांना कष्टाचे फळ मिळाले आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली जिद्द चिकाटी सचोटीने यशस्वी वाटचाल सुरू केली माझ्या वाट्याला आलेले संकट दुःख माझ्या मुलाबाळांच्या वाटेला येऊ नये ही मनाशी पक्की गाठ बांधून गुरुजनांच्या आशीर्वादाने सिव्हिल इंजिनियर या व्यवसायात आघाडी घेतली आहे त्यांच्या संसाराच्या हिरव्यागार वेलीवर दोन गोंडस मूल आहेत त्यांचे व्यवसायिक शिक्षण झाले आहेअमेरिकेत साहील यांनी शिक्षण घेतले तर मुलगी सानिया हिने देखील व्यवसायिक शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आहे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर फरास यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे या त्यांच्या कार्याची दखल संघर्ष मीडिया यांनी घेतली असून त्यांना 8मे रोजी राज्य स्तरीय संघर्ष नायक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यानिमित्त त्यांच्या कार्याविषयी सुवर्णकण वेचत आहे त्यांच्या कार्याचा कष्टमय प्रवास आपल्यासमोर मांडत आहे


शब्बीर फरास हे आपला जीवनपट उघडताना भावनिक झाले होते बालपण शालेय जीवन विवाह सोहळा घेतलेले कष्ट हा धावता टिझर त्यांच्या नजरेसमोर राहिला आणि ते बोलू लागले त्यांनी सांगितले
सन १९८७ साली बारावी उत्तीर्ण झालो इंजिनिअरिंग ला जायचे स्वप्न होते ; मात्र घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे बी.एस. सी. ला ऍडमिशन घेतले. हि बातमी ज्यावेळी माझ्या १२ च्या वर्ग शिक्षकांना समजली त्यावेळी त्यांनी स्वतःची ३००रु. भरुन मला इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन मिळवून दिले. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. त्या थोर शिक्षकाचे नाव आदरणीय . बी.एन. चौगुले सर होय.
ह्याचे कारण म्हणजे १२चे शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थितीमुळे मी जळाऊ लाकडाच्या वखारीमध्ये जळण फोडण्याचे तसेच ढकलगाडीमधून जळण घरोघरी पोहच करायचे काम करत होतो. ह्यासोबत मी टेलरिंग चे हि काम केले परंतु बोटामधून सुई आरपार गेल्यामुळे मी ते काम सोडून दिले. सोबतच घरोघरी जाऊन पहाटे पेपर वाटपाचे सुध्दा काम केले.माझी ही धडपड सरांनी खूप जवळून पहिली होती.
जेव्हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा निकाल लागला तेव्हा आमच्या वर्गामध्ये आम्ही दोघेजण फरास आडनावाचे विद्यार्थी होतो. निकालामध्ये मी उत्तीर्ण झालो व माझा मित्र अनुत्तीर्ण झाला.त्याची कॉलेज फी पूर्ण भरलेली होती आणि माझी फी भरायची राहिली होती. परंतु क्लार्कच्या नजरचुकीमुळे फी अपूरी असून सुद्धा मला निकाल मिळाला. तेव्हा कोणीही माझी मार्कशीट परत घेऊ नये ह्या भीतीने मी कॉलेज मधून धावत निघालो होतो.त्या क्षणी मनामध्ये उत्तीर्ण झाल्याचा आनंद हि होता आणि फी अपूरी राहिल्याची खंत हि होती.परिस्थिती कशीही असो पण मी त्या परिस्थितीचा निर्भयपणे सामना केला.
निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते आज अखेर मी जवळपास ५५०-६०० इमारतींचे काम केले. त्याचबरोबर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये टेलिफोन खात्याचे लोकल व ओ.एफ.सी. चे काम केले. दानोळी गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मला हनुमान मंदिर बांधण्याचे भाग्य लाभले.तसेच जयसिंगपूर येथे धरणगुत्ती रोड येथील ईदगाह मैदानावरली जयसिंगपूर सांस्कृतिक भवन अशी भव्य इमारत उभी केली. आपण समाजाचे काहीतरी ऋण फेडण्याचा भावनेने विनामोबदला हि कामे पार पाडली. जयसिंगपूर कॉलेजचे ४००मी. चे रनिंग ट्रॅक ,स्विमींग पूल , इंडोर- आऊटडोर स्टेडियम ,जयसिंगपूर नगरपालिकेचे शाहूनगर येथील उद्यान आणि सांस्कृतिक भवन , आरग-बेडग येथील बाळकृष्ण ब्रीडिंग फार्म (पोल्ट्री फार्म) अशी अनेक कामे केली. माझ्या ह्या जीवनामध्ये मला माझे आई-वडील, माझी पत्नीची मोलाची साथ मिळाली. माझी पत्नी स्वतः उच्च शिक्षित असल्याने तिने माझ्या दोन्हीही मुलांना घडवले.आज अखेर माझा मुलगा “साहील” अमेरिकेमधून मास्टर्स पदवी मिळवून आला व माझी मुलगी “सानिया” हिने कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स पदवी मिळवली.हि माझी दोन रत्ने आणि माझा अशा तिघांची गल्ली नं.१३,जयसिंगपूर येथे “साहील फरास अँड असोसिएट्स” अशी सिव्हिल इंजिनिअरिंगची फर्म आहे. पुढील काळात आमच्या कुटुंबांच्या कडून समाजसेवा ते आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी प्रयत्न घडावेत हीच ईश्वराकडे मनोमनी प्रार्थना आहे . माझ्या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय संघर्ष नायक हा पुरस्कार दिल्याबद्दल संयोजकाचे आभार मानायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत