आधुनिक भारताचे निर्माते :राजा राममोहन रॉय
प्रसाद माधव कुलकर्णी
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)
( ९८ ५०८ ३० २९०)
Prasad.kulkarni65@gmail.com
सोमवार ता. २२ मे २०२३ रोजी आधुनिक भारताचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय यांचा २५१वा जन्मदिन आहे. २२ मे १७७२ रोजी जन्मलेल्या या महामानवाचे निधन २७ सप्टेंबर १८३३ रोजी झाले. भारतातील आधुनिक विचारांचे व सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.एकोणीस व विसाव्या शतकातील अनेक सामाजिक ,शैक्षणिक, धार्मिक सुधारणांचा जन्म त्यांच्या कार्यकर्तृत्वात झालेला दिसून येतो. बंगालमध्ये सनातनी सधन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या राजाराम मोहन यांच्यावर उर्दू व फारसी भाषांचा विशेषतः सुफी पंथीय शिकवणुकीचा मोठा प्रभाव होता. विविध धर्मांचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला होता. त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता.या विषयावर वडिलांशी मतभेद होऊन ते घराबाहेर पडले.त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी केली. नोकरी सोडून ते १८१५ साली कलकत्त्याला आले. तेथे त्यांनी ‘आत्मीय सभा ‘स्थापन केली. या सभेत धर्म आणि एकेश्वरवादावर चर्चा होत असे. १८२५ साली त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार भारतात व्हावा ,पाश्चात्य संस्कृतीत विकसित झालेले विज्ञान आणि पौर्वात्य संस्कृती यांचा समन्वय साधला पाहिजे म्हणून त्यांनी लोकशिक्षणावर भर दिला.
सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून त्यांनी सांगितले की, सर्व धर्मात समानतेचा आणि बंधूभावाचा उपदेश केलेला आहे. त्या त्या धर्मात नंतर वाढलेले भ्रष्ट स्वरूप, कर्मठपणा, औपचारिकपणा सोडला तर मानवामानवात प्रेमाचे व राष्ट्राराष्ट्रात सामंजस्याचे वातावरण निर्माण होऊ शकेल. धर्माधिष्ठित समाजाचा उद्धार करायचा असेल तर प्रथम धर्म सुधारणा केली पाहिजे या भूमिकेतून त्यांनी काम केले.धर्मात सुधारणा झाल्या की सामाजिक सुधारणा होणे शक्य होईल या विश्वासातून त्यानी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. जगातील सर्व लोकांना एका धर्मछत्राखाली आणण्याच्या हेतूने त्यांचा एकेश्वरवाद प्रेरित झाला होता. एका अर्थाने ते मानवतावादी चळवळीचे अग्रणी होते. १८२९ साली सतीबंदीचा कायदा त्यांच्याच प्रयत्नातून झाला. स्त्रियांच्या हक्कांसाठी पहिला आवाज राजा राममोहन रॉय यांनीच उठवला. स्त्रीमुक्ती चळवळीचे,स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.आंतरजातीय विवाह व विधवा विवाह यांचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.
युरोपीय संस्कृतीतील भौतिकवाद हिंदू धर्मातील अध्यात्मवाद तसेच बुद्धिवाद व श्रद्धा यांच्या समन्वय साधावा आणि ज्ञानाचा व मानवतेचा प्रचार करून समाजात जागृती निर्माण करावी हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.देशाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण बदल झाल्याखेरीज अंधश्रद्धा आणि रूढीच्या बंधनात अडकलेल्या समाजाची सुधारणा अशक्य आहे ही त्यांची भूमिका होती. त्यातूनच त्यांनी १७५२ साली स्थापन झालेल्या बनारस विद्यापीठाला विरोध केलेला होता. अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी,विज्ञान ,गणित हे विषय असलेच पाहिजे याबद्दल ते आग्रही होते. १८१६ मध्ये त्यांनी त्याच भूमिकेतून इंग्रजी शाळा काढली.
राजा राममोहन रॉय यांच्या राजकीय दृष्टिकोन ही महत्त्वाचा होता. व्यक्तीला जीवित, वित्त ,नैतिक स्वातंत्र्याचे हक्क हवेत असे त्यांचे मत होते.मात्र नैसर्गिक हक्क सामाजिक सुधारणा व मानवी कल्याणाच्या आड येऊ नयेत असे ते म्हणत. दिल्लीच्या बादशहाची एक तक्रार घेऊन १८३१ साली ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी राज्यकारभारातील सुधारणांविषयी ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चर्चा केली.१८३३ च्या चार्टर ॲक्टमध्ये अनेक व्यवस्थापकीय व शासकीय सुधारणा झाल्याचे श्रेयही राजाराम मोहन रॉय यांच्याकडे जाते. भारतातील विविध समाज घटकांना मान्य असलेल्या तत्त्वांच्या आधारे कायद्याचे नव्याने संहीतीकरण झाले पाहिजे आणि त्याद्वारे देशातील सर्वच व्यक्तींना एकच सामाजिक कायदा लागू केला पाहिजे ही त्यांची कल्पना होती.
विविध विषयांवर त्यांनी वृत्तपत्रातून सातत्याने लेखन केले. तसेच विविध विषयांवर फारसी, हिंदी, बंगाली,इंग्रजी आदी भाषांमधून सत्तेचाळीस पुस्तके लिहिली. राजा राम मोहन रॉय यांनी १८२० साली आपल्या मताचा प्रसार करण्यासाठी ‘मिरात उल अखबार’ हे फारसी वृत्तपत्र काढले. १९२६ साली’संवाद कौमुदी’ हे बंगाली वृत्तपत्र काढले. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबाबत त्याने आवाज उठवला.
राजा राम मोहन रॉय यांना वैश्विक दृष्टिकोन लाभलेला होता. म्हणूनच त्यांना फ्रेंच राज्यक्रांती आणि युरोप मधील इतर देशांच्या स्वातंत्र चळवळीबद्दल ममत्व होते.जगातील राष्ट्रांची एखादी मध्यवर्ती संघटना असावी. सर्व जगात शांतता, न्याय प्रस्थापित व्हावा असेही त्यांनी म्हटले होते. भारताचा मध्ययुगीन काळ संपून आधुनिक काळ सुरू करणारे राजा राम मोहन रॉय हे सर्वार्थाने द्रष्टे युगपुरुष होते.