गझल हा उत्कट कवितेचा परमोच्च बिंदू – ज्येष्ठ गझलकार हेमंत डांगे यांचे प्रतिपादन

गझल हा उत्कट कवितेचा परमोच्च बिंदू – ज्येष्ठ गझलकार हेमंत डांगे यांचे प्रतिपादन

गझल हा उत्कट कवितेचा परमोच्च बिंदू


ज्येष्ठ गझलकार हेमंत डांगे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर ता.१९

दूर सारे जात असता लाभली आहे गझल
तापलेल्या या जिण्याला सावली आहे गझल…

आणि

गझलेचे आयुष्य भोग तू
जन्म कुठे उलगडला आहे?..

जीवनाचा ग्रंथ सारा छापता आलाच नाही
शेष मागे राहिल्या गझलेतल्या या चार ओळी..

असे जीवन आणि गझल यांच्या परस्पर संबंधाचे नाते ज्येष्ठ कवी गझलकार हेमंत डांगे यांनी उलगडून दाखवले. गझल ही केवळ तात्पुरत्या टाळ्या घेणारी नाही तर अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारी असते. जीवन जगताना आलेले अनुभव, नाट्य गझलेत प्रतिबिंबित होते.गझल हा उत्कट कवितेचा परमोच्च बिंदू असतो. सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने गेली चार दशके मी गझल लेखन करत आहे. आयुष्य व्यापले जाते तेव्हा गझल खऱ्या अर्थाने कळू लागते. माझी गझल प्रांजळपणा, सच्चेपणा यांची जपणूक करत अनुभवाच्या आधारे पुढे जात आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. ते गझलसाद संस्थेच्या वतीने शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला स्वरचित गझल व गझल लेखन प्रवास सादरीकरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

येथले सारेच पक्षी उंच झेपावून जाती
येत नाही मात्र हे आकाशा कोणाच्याच हाती…
मी तिच्यामध्ये मिसळलो आपली मानून अंती
मालकीची राहिली नाही खरी माझीच माती…

असे मांडत हेमंत डांगे म्हणाले, सुरेश भटांच्या गझलांनी मराठी गझलेची वाट दाखवली. त्यांचे शेर जगलो.उन्मळून पत्र लिहिली.त्यांच्या ‘ लिहीत रहा ‘ या शब्दांच्या आधाराने मराठी गझल लिहित राहिलो. त्याचप्रमाणे हिंदी व उर्दू गझल लेखनाचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्याचा कागद हा लोकांच्या चुकांची नोंद ठरवू नये म्हणून आपल्या शब्दकृतीकडे पाहत राहिलो.

तुला भेटायला आला पुन्हा पाऊस हा माझा
मुके संदेश मातीचे नभाला पोचले होते..
घराच्या पायऱ्यांनीही उभे राहू दिले नाही
अगत्यांनी पुन्हा माझ्या खिशाला मोजले होते…

आणि

विजय तुझा हा तरी मलाही याचे बक्षीस छान मिळाले
अभिनंदन मी करतो आहे लाख मला अपमान मिळाले..
सेवाभावी दुकानातल्या तत्परतेचा मी आभारी
अखेरीस या मयताला पण जगण्याचे सामान मिळाले..

बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतच्या मानवी जीवनातील विविध अवस्था, जात्यांधतेदेते पासून आरक्षणापर्यंतचे विविध सामाजिक विषय, मानवधर्माची सर्वश्रेष्ठता, मानवी जीवनातील प्रेम, द्वेष, दुःख यासह सर्व भावभावना यांची मांडणी करणाऱ्या विविध वृत्तातील आशयघन रचना हेमंत डांगे यांनी सादर केल्या. तसेच आपला गझल लेखन प्रवास विशद केला.सारिका पाटील, नरहर कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी यांनीही हेमंत डांगे यांच्या काही गझला यावेळी सादर केल्या. यावेळी उपस्थित असलेल्या गझलसादच्या गझलकारांनीही आपली प्रत्येकी एक रचना सादर केली.घर नागेशकरांचे या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमास सुभाष नागेशकर ,डॉ.सुभाष आठल्ये,डॉ.दयानंद काळे ,खालील मोमीन, उमेश महाजनी ,सुधीर कुंभार ,कृपेश हिरेमठ ,सुहास नाईक ,अरुंधती नाईक, ज्ञानेश्वर डोईफोडे ,ब्रहस्पती शिंदे ,शितल शेटे ,सुरेश श्रीखंडे, अविनाश शिरगावकर, मनीषा शिंदे यांच्यासह गझल काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *