प्रचाराची घसरती पातळी , असभ्यता व खोटेपणा

प्रचाराची घसरती पातळी , असभ्यता व खोटेपणा

प्रचाराची घसरती पातळी , असभ्यता व खोटेपणा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com

अठराव्या लोकसभेसाठी आतापर्यंत जवळ जवळ दोनशे जागांवर लोकांनी मताधिकार बजावलेला आहे. एक तृतीयांशहून अधिक जागांवरील निकाल ईव्हीएम मध्ये बंद आहेत. उर्वरित जागांसाठी प्रचार जोरात सुरू आहे. या साऱ्याचाच निकाल बरोबर एक महिन्यानी म्हणजे ४ जूनला लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या प्रचाराची पातळी अत्यंत खालावलेली आहे यात शंका नाही. कमी अधिक प्रमाणात विविध पक्षातील वाचाळवीर जोमात आहेत.त्यात जबाबदारीचे वर्तन अपेक्षित असलेल्या सत्ताधारी पक्षाचे अधिक लोक आहेत. सर्वाधिक सभा घेणारे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाटाही मोठा आहे. कारण गेल्या दहा वर्षाच्या सत्ता काळात १४० कोटी जनतेचे जमिनीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय केले याबाबत ते काहीही बोलत नाहीत .स्वातंत्र्यानंतरची पहिली पासष्ठ वर्षे आणि पुढील २५ वर्षे याबद्दल ते अनेक भाष्ये करत असतात. मंगळसूत्रा पासून भटकती आत्मा पर्यंत अनेक वाह्यात विधाने निवडणूक प्रचारसभात होत आहेत.गेल्या काही वर्षात मेक इन इंडिया, स्टार्टअप,
स्किल इंडिया, स्मार्ट सिटी ,अच्छे दिन, आत्मनिर्भर अशा अनेक शब्दांचे लादलेपण सुरू होते.पण त्यातील काहीही झाले नाही म्हणून आता निवडणुकीच्या प्रचारात गॅरंटी हा शब्द आणला आहे. ती सुद्धा पक्षाची नव्हे तर व्यक्तीची गॅरंटी आहे. उमेदवाराचा प्रचारही अमुकचे हात मजबूत करण्यासाठी मत द्या, या उमेदवाराच्या जागी तमूक व्यक्ती उभी आहे असे समजून मत द्या असा व्यक्तिवादी प्रचार ही प्रचाराची पातळी घसरली याचेच निदर्शक आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा पक्ष म्हणून येणाऱ्या पक्षातील एक व्यक्ती आपल्या पक्षालाच फाट्यावर कसे मारते याचे हे उदाहरण आहे. पक्षामुळे मी नाही तर माझ्यामुळे पक्ष आहे हा संदेश स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांनाही यातून दिला जात आहे. पण महत्त्वाचा मुद्दा आहे तो हे सर्व कमालीच्या खोटेपणाने होत आहे. मागच्या लोकसभा निवडणुकी वेळी मा. पंतप्रधानांनी आपल्या प्रचार दौऱ्याला ‘ तीर्थयात्रा’ असे म्हटले होते.पण त्यांची तीर्थ आणि यात्रे बद्दलची संकल्पना गेल्या काही वर्षात त्यांच्याकडूनच उघडी पडत आहे. कारण तीर्थयात्रेमागे भारतीय संस्कृतीत एक उदात्त विचार आहे. तिथे सत्य, प्रामाणिकता ,अंतरिक शुद्धता, पावित्र्य आदिना फार महत्त्व असते. पण प्रचारात साऱ्याचा कमालीचा अभाव आहे. राष्ट्रपिता गांधीजी यांचा ‘ईश्वर सत्य है ‘पासून ‘सत्य ही ईश्वर है ‘असा व्यापक वैचारिक प्रवास होता. पण आता निवडणूक प्रचारात अनेक वाचाळवीर आपल्या मुखातून धादांत असत्य ओकत आहेत. हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे.

या निवडणुकीत होत असलेला व्हाट्सअप, फेसबुक,एक्स, इंस्टाग्राम आदी सर्व समाज माध्यमांमध्ये आणि जाहीर भाषणांमध्ये होणारा प्रचार सत्यापेक्षा असत्याच्या अंगाने अतिशय जोमात आहे. असत्य जोमात आणि सत्य कोमात अशी परिस्थिती आहे.तसेच हा प्रचार विषारी व विखारी पद्धतीने होते. गतवर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यापूर्वी १७ वेळा लोकसभेच्या निवडणुका देशात झालेल्या आहेत. तसेच विविध राज्यांच्या शेकडो विधानसभा निवडणूकाही झालेल्या आहेत. पण या निवडणुकी एवढा थापेबाजी प्रचार यापूर्वी दिसला नाही हे वास्तव आहे.अठरावी सार्वत्रिक निवडणुक होत असताना प्रचार प्रक्रियेत फेक न्युज,फेक कन्टेन्ट, डीप फेक म्हणजे खोट्या बातम्या, खोटी माहिती व आकडेवारी, अर्धसत्य, बनावट व मिश्रित चित्रफिती यांच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेतील प्रचारामध्ये अतिछद्मताहणजे अती खोटारडेपणा येत आहे. त्याला वेळीच आवर घातला गेला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील.

सत्ताधाऱ्यांकडून जनता दहा वर्षाच्या सत्ता काळाचा हिशोब मागते आहे, पहिल्या दोन टप्प्यामधील निवडणूकीत मताधिकारांबाबत लोक उदासीन आहेत .त्यामूळे मताधिकाराचा टक्का घसरतो आहे हे लक्षात आल्यावरआता प्रत्येक टप्प्यावर प्रचारातील खोटेपणा वाढत जाणार आहे. अशावेळी सुज्ञ मंडळींनी आपला विवेकवाद जागृत ठेवण्याची गरज आहे. कारण वाचाळवीर बेलगाम सुटले आहेत. आचारसंहिता नावाचे प्रकरण गुंडाळून ठेवले जात आहे. आणि निवडणूक आयोग सोयीस्करपणे काही व्यक्ती व पक्षांबाबत पक्षपाती भूमिका घेतो आहे हेही दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात का टाकले असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयही उपस्थीत करीत आहे. यामागील अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

संसदीय लोकशाहीचा हा आव्हानात्मक संक्रमण काळ आहे. गेल्या सलग दोन निवडणुका बहुमताने जिंकणारेच आपल्या विजयाबाबत साशंक आहेत काय असे दिसते. अर्थात सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो ते जनता ठरवत असते. अबकी बार चारसो पार या नाऱ्याला अबकी बार तडीपार असे उत्तर दिले गेले आहे. त्यामुळे पहिल्या फेरीनंतरच ही घोषणा अंगलट आली आहे. म्हणून विरोधक सत्तेवर आले तर काय होईल याची भीती दाखवली जात आहे.याचाच अर्थ आम्ही येणारच हा आत्मविश्वास कुठेतरी उसना आहे याची अप्रत्यक्ष कबुलीच आहे.आम्ही घटना बदलणार नाही असे सत्ताधाऱ्यांनाच सांगावे लागत आहे. एकूण अनेक बाबीत सत्ता पक्षाला विरोधकांच्या अजेंड्यावर बोलावे लागत आहे. म्हणून तर मा.पंतप्रधान काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरच बोलत आहेत. पण ते सत्या ऐवजी असत्य बोलत आहेत हे दिसत आहे. गेल्या सलग दोन निवडणुकीत पूर्ण बहुमत जिंकणारे आता एका वेगळ्या भीतीच्या छायेत आहेत आणि सलग दोनदा ज्यांचा पराभव झाला ते नव्या ताकतीने लढायला सज्ज झाले आहेत. असे आजचे चित्र आहे हे नाकारता येत नाही.कविवर्य सुरेश भट यांनी म्हटले होते,

जिंकणाऱ्यांनाच आता वाटते भीती जयाची
हरणाऱ्यानी न केली बंद केंव्हाही लढाई,
लावती प्रत्येक वेळी जिंकणारे जाहिराती
वाढते प्रत्येक वेळी हरणाऱ्यांची धिटाई..

ही धिटाई सामान्य माणसाची आहे. अलीकडे प्रकाशित झालेल्या एका संगणक सुरक्षा कंपनीच्या अहवालानुसार देशातील ७५ टक्के लोकांपर्यंत समाज माध्यमांतून धादांत खोटी अर्थात अतिछद्म स्वरूपाची माहिती चित्रफिती, आकडेवारी ,बातम्या, लेख अशा स्वरूपात पोहोचत आहे. आणि त्यांना ही माहितीअसत्य आहे याची जाणीव नसते.सत्यामध्ये, तथ्यामध्ये मोडतोड करून किंबहुना तथ्य हे तथ्यच नाही असे सांगण्यापर्यंत अतिछद्मची मजल गेलेली आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षांचे आयटी सेल हा खोटेपणाचा आजार खरेपणाने पसरवीत आहे. असा फेक कंटेंट , फेकूगिरी यातील सत्यता न पडताळता ती फॉरवर्ड करत राहणे योग्य नाही.कारण या साऱ्यातून एका खोटेपणाच्या भयावह गर्तेत समाज लोटला जात आहे. त्यामुळे समाज माध्यमातून फॅक्ट चेक करण्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासासाठी वापर करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता विकृतीकडे नेणे फारच घातक ठरेल. म्हणूनच कोणत्याही पक्षाच्या आणि नेत्याच्या प्रचारातील खोटेपणा सुज्ञ जनतेनेच उघडा पाडण्याची गरज आहे.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *