शिक्षक-पदवीधर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षक भारती हायकोर्टात
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
निवडणूक आयोगाने शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक 10 जून रोजी जाहिर केली आहे. परंतु मे महिन्याच्या सुट्टीत बाहेर जाणारे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे ही तारीख बदलून शाळा सुरु झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटी मतदान घ्यावे या मागणीसाठी शिक्षक भारतीच्यावतीने सुभाष किसन मोरे यांनी मुंबई हायकोर्टात दाद मागितली आहे.
शिक्षक भारतीच्या याचिकेची सुट्टीतील मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वकीलांनी शिक्षक भारतीच्या मागणीचा विचार करुन उद्या अंतिम निर्णय घेऊ असे कोर्टापुढे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 2 मे ते 14 जून पर्यंत सुट्टी कालावधी जाहिर केला असून शाळा 15 जून नंतर सुरु होणार आहेत. तसेच 17 जून ते 20 जून पर्यंत बकरी ईद निमित्त उर्दू माध्यमांच्या शाळांना सुट्टी असते. मुंबईतील शिक्षक पदवीधर मतदार संघातील उत्तर भारतीय शिक्षक टिचर्स स्पेशल ट्रेनने 11 जून 2024 रोजी मुंबईत परतणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील अनेक शिक्षक सुट्टी कालावधीत मूळ गावी किंवा कुटुंबाह पर्यटनासाठी बाहेरगावी गेले आहेत. उपरोक्त सर्व बाबींचा उल्लेख शिक्षक भारतीच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिक्षक भारतीच्यावतीने कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे, उत्तर विभाग अध्यक्ष अकबर खान आणि शिक्षक भारतीचे पदाधिकारी हिंदूराव देशपांडे यांनी याचिका दाखल केली आहे. ॲड. सचिन पुंडे यांनी शिक्षक भारतीची बाजू मा. मुंबई हायकोर्टात मांडली.
मुंबईतील एकही शिक्षक मतदानापासून वंचित राहू नये म्हणून आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे दिल्ली येथे भारत निर्वाचन आयोगाला निवेदन दिले आहे. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलण्याबाबत विनंती केली आहे.