पंचगंगा नदी गाळमुक्त करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे प्रयत्नशील
इचलकरंजी/प्रतिनिधी –
शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होण्यासाठी येथील पंचगंगा नदीपात्रातील बंधार्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून तो शेतकर्यांना मोफत घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे हे प्रयत्नशील आहेत. या संदर्भात सोमवारी कोल्हापूर येथे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आवश्यक ती कार्यवाही करण्याचा निर्णय झाला. आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन अंतिम निर्णयासाठी 15 मे रोजी संबंधितांची पुन्हा बैठक होत आहे.
इचलकरंजीतील पंचगंगा नदी पात्रातील गाळ शेतकर्यांना मोफत काढून नेण्यासाठी परवानगी देणेबाबत महसुली मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आदेश दिला आहे. त्या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी मौसमी चौगुले, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, महानगरपालिकेचे जलअभियंता सुभाष देशपांडे, प्रादेशिक अधिकारी, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, जिल्हा गौण खनिज अधिकारी उपस्थित होते.
इचलकरंजी शहरालगतच असलेल्या पंचगंगा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदी पात्राची खोली कमी होऊन महापूरासह दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात एक बंधाराही घालण्यात आला आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून पात्रातील गाळ न काढल्याने त्याचबरोबर गणेशोत्सव काळात नदीपात्रात श्री मूर्तीचे विर्सजन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने बंधार्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. नदीपात्रातील हा साचलेला गाळ काढण्याची गरज ओळखून आमदार प्रकाश आवाडे यांनी राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावर दोन महिन्यांपूर्वी महसुलमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांना या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश पारीत केले. तर आमदार आवाडे यांनी हे काम उन्हाळ्यातच शक्य असल्याने तातडीने कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना केल्या होत्या.
पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. बंधार्याच्या दोन्ही बाजूस जवळपास सहा ते सात फुटापर्यंत गाळा काढल्यास याठिकाणी पाणीसाठा करुन पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यासह महापूराचा धोकाही टाळण्यास मदत होणार आहे, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, तारारणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, राहुल घाट, सतीश मुळीक, नितेश पोवार आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
पंचगंगा नदी गाळमुक्त करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे प्रयत्नशील
