ओबीसींचे 100 आमदार निवडून आणूया -ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी

ओबीसींचे 100 आमदार निवडून आणूया -ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथे शुक्रवारी दाखल झाली. या वेळी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ओबीसींचे 100 आमदार निवडून आले पाहिजेत असे आमचे मत आहे. राज्यातील 22 जिल्ह्यांत आमची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या जे दूषित वातावरण तयार झाले आहे ते शांत आणि नितळ करण्यासाठी आम्ही ही यात्रा काढली आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून टोलवाटोलवी सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही या वेळी ॲड. आंबेडकर यांनी केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सगेसोयरे आरक्षणाला आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने सगे सोयाऱ्यांच्या बाबतीत जे जजमेंट दिले आहे. त्यामध्ये सगेसोयरे आरक्षण नाकारले आहे. त्यामुळे कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही.
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावरसुद्धा तोफ डागली. ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त मराठ्यांचे पक्ष राहिले आहेत. भाजप आणि शिवसेना सुद्धा मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करत नाही. भाजप झुंज लावून बघत बसलेला पक्ष असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.

प्रत्येक राजकीय पुढारी आता मला माझ्या समाजाची मते कशी मिळतील हे बघत आहे. पण राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात्रेनंतर विधानसभेचे पाहू, असेही आंबेडकर यांनी म्हटले. आम्हाला दोन्हीकडून बाजूला सारले जाते, हे म्हणतात हे आमचे नाहीत, ते म्हणतात हे आमचे नाहीत. मला भाजपची बी टीम सुद्धा म्हटले जाते. मात्र, मला कोणी हरवले ? मला भाजपने हरवले मग मला भाजपची बी टीम कशी म्हणता ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *