मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)
५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,
समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com

२७ जुलै हा भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.तामिळनाडूतील रामेश्वरम जिल्ह्यातील धनुष्कोडी या गावात १५ ऑक्टोबर १९३१ रोजी डॉ.कलाम यांचा जन्म झाला. आणि २७ जुलै २०१५ रोजी ते कालवश झाले. ‘डॉ.अब्दुल पाकिर जैनुलबुद्दीन अब्दुल कलाम ‘ असे त्यांचे पूर्ण नाव होते. एका गरीब मच्छिमाराच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. कलाम यांना सात भावंडे.अशिक्षित असलेल्या आई – वडिलांनी मला शिकवले. मुलांनीही वडिलांना मदत करत त्यांचे स्वप्न साकार केले.डॉ. कलाम यांनी लहानपणी वृत्तपत्र विक्रीचेही काम केले. त्यांना गणिताची आवड होती.

१९५४ साली मद्रास विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यानंतर हवाई अभियांत्रिकीची पदवीही त्यांनी घेतली.अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेतून अर्थात नासातून त्यांनी प्रशिक्षण घेतले.संशोधनातील रुची मुळे त्यांनी संशोधनाला वाहून घेतले.इस्त्रोच्या उपग्रह प्रक्षेपक निर्मिती कार्यक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. दोन वर्षात त्यांनी उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रात भारताला जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिले. भारतीय बनावटीचे उपग्रह प्रक्षेपण यान slv-3 तयार करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.अग्नि आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांनी केली. भारतीय बनावटीच्या स्वनियंत्रित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले.देशातील अनेक संशोधन संस्थांच्या सहकार्याने भारतीय बनावटीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.डॉ.कलाम यांनी भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम पाहिले. वैज्ञानिक स्वरूपाच्या अनेक समित्यांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९८१)पद्मविभूषण(१९९०) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९९७) प्रदान करून गौरविले होते. देश-विदेशातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी होते.

डॉ.कलाम यांनी अनेक पुस्तके लिहून विज्ञानाचा प्रसार केला. भारत-२०२०,प्रज्वलित मने ,विंग्ज ऑफ फायर इत्यादी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.अनेक भारतीय भाषेत ती अनुवादित झाली व गाजली. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी त्यांनी फार मोठी कामगिरी केली. विद्यार्थी वर्गात ते अतिशय लोकप्रिय होते. ते राष्ट्रपती असतानाही मुलांशी सहजपणे संवाद साधत असत. त्यांचा संवाद आणि लेखन अतिशय परिणामकारक असे.तुम्ही झोपेत असताना पाहता ती स्वप्ने खरी नाहीत, तर जी तुम्हाला झोपू देत नाही हीच खरी स्वप्ने. / नेहमी तुमच्या कामावर प्रेम करा, कंपनीवर नको,कारण कंपनी तुमच्यावरील प्रेम कधी कमी करेल हे तुम्ही सांगू शकत नाही./ अपयशासारख्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आत्मविश्वास आणि परिश्रमाशिवाय दुसरे चांगले औषध नाही. / एखाद्या व्यक्तीला जिंकणे ,त्याचा पराभव करण्यापेक्षा खूप अवघड आहे. / प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेल्या गोष्टीच वाट पाहणाऱ्यांना मिळतात, यासारखी असंख्य अनुभवसिद्ध विधाने त्यांच्या लेखनातून ,भाषणातून मिळत जातात. त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळते.

उत्तम वीणा वादक असलेल्या डॉ. कलाम यांना शास्त्रीय संगीतात विशेष रुची होती. कलावंताचे मन असलेला, विज्ञानाचा ध्यास घेतलेला आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्याविषयी प्रचंड आशावादी असलेला असा दुसरा माणूस दुर्मिळच.डॉ. कलाम यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारे भारत महासत्ता होऊ शकतो असा विश्वास निर्माण केला. पण राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाने यात काही प्रश्न उभे ठाकले. डॉ.कलाम हे स्वप्न पेरणारे आणि ती सत्यात उतरवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिलेले महामानव होते. एक साधासरळ, डामडौल विरहित ,अहंकाररहित असलेला हा माणूस करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळालेला होता. मनाने हळवे आणि ममताळू असलेले डॉ. कलाम सर्वार्थाने ” भारतरत्न ” होते.मोठमोठी पदे त्यांच्याकडे चालत आली. पण त्या पदांच्या प्रोटोकॉल मध्ये हा माणूस कधी अडकला नाही. असा राष्ट्रवादी दुर्मिळ असतो.

सोमवार ता.२७ जुलै २०१५ हा दिवस भारतासाठी मोठा दुःखद ठरला.कारण सकाळी सूर्योदय होत असतानाच पंजाबातील गुरुदासपूर येथे दहशतवादी हल्ला झाला. आणि सूर्यास्त झाल्यावर काही वेळातच म्हणजे साधारणतः पावणे आठच्या सुमारास डॉ.कलाम हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कालवश झाले.मणिपूरची राजधानी शिलाँग येथे आय.आय.एम. च्या कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ते कोसळले. ते आपल्याला कायमचेच सोडून गेले.भारताच्या संरक्षण संशोधन क्षेत्रात त्यांनी फार मोलाची कामगिरी केली. “मिसाईल मॅन ” ही त्यांची ओळख अनेक अर्थाने अर्थपूर्ण आहे.फार मोठा विचारसंपन्न वारसा ते केवळ भारतासाठी नव्हे तर अखिल मानवजातीसाठी मागे ठेवून गेले आहेत.

विद्यार्थी वर्गाचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. कलाम यांचा जन्म दिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो.खरे तर मानवी संस्कृती विकसित करण्यासाठी वाचन संस्कृती वाढविण्याची गरज आहे.वाचन हे केवळ शब्दांचे नसते तर लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचेही ते वाचन असते. ज्ञान ,मनोरंजन, आकलन ,प्रबोधन, बुद्धीची मशागत, नैतिक मूल्य ,आनंद असे अनेक वाचनाचे हेतु असतात. पंधराव्या शतकात छपाईचा शोध लागला. शेक्सपिअरच्या साहित्याने वाचनसंस्कृतीला प्रेरणा दिली. म्हणून तर २३ एप्रिल हा दिवस “जागतिक ग्रंथदिन “म्हणून युनोने जाहीर केला.महाराष्ट्रातील संतपरंपरेने, प्रबोधन परंपरेनेही वाचन संस्कृतीचा जागर केला आहे. “दिसामाजी काही लिहीत जावे ,प्रसंगी अखंडित वाचीत जावे ” यापासून ” ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा ” ही वचने आपल्याला दिसतात.वाचन संस्कृती संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवरही वाढली पाहिजे. वाचनाने परिपूर्णता येते ,संभाषणाने तत्परता येते आणि लिहिण्याने मोजके पण येतो असे बेकन म्हणत होता.उत्तम ऐकले तर उत्तम बोलता येते ,उत्तम वाचले तर उत्तम लिहिता येते. आणि या साऱ्या मुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत असते.हे या डॉ.कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ध्यानात घेतले पाहिजे. वाचन संस्कृती विकसित करण्यामध्ये सार्वजनिक वाचनालये मोठी भूमिका बजावत असतात. त्या वाचनालयांचे आपण सभासद होणे आणि आपल्या घरी वाचनासाठी सदैव पुस्तक उपलब्ध असणे हे आदर्श नागरिकाचे लक्षण आहे असे मला वाटते होते. तीच डॉ.कलाम यांना खरी आदरांजली ठरेल.

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *