
नाशिक:- सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची एक योजना चालवली जाते. या योजनेचे गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते. योजनेत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांवर डल्ला मारल्याचा ठपका सरकारनं ठेवला आहे.
लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे पाठवणं, मग ते पैसे स्वतःच दुसऱ्या खात्यात वळवून घेणं, त्यासाठी लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामं करण्यासाठी स्वतःच्या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडणं, असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.
शासनाच्या समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे, आणि हा अहवाल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर करून केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.