शिक्षकाने डोक्यात वरवंटा घालून केला शिक्षक पत्नीचा खून
कोल्हापूर, दि.१ (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून मुरगूड येथील एका शिक्षकाने अल्पवयीन मुलाच्या मदतीने शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेनऊच्या वेळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुरगूड मधील साई कॉलनीतील अपूर्वाई बंगल्यात शिक्षक परशराम पांडुरंग लोकरे (व. व. ५३ ) व त्यांची पत्नी शिक्षिका सविता लोकरे (व. व. ४५) हे शिक्षक दांपत्य मुलगा आणि दोन मुलींसह राहतात. परशराम व सविता या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार भांडण होत होते. आज सकाळी चहा घेत असताना या दोघां मध्ये शाब्दिक वाद झाला. मुलांनी भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही. सविता या भांडी घासायला गेल्या असता तिच्या अल्पवयीन मुलाने तिला पकडले आणि राग अनावर झालेल्या पती परशराम याने सविताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्या जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी बाप लेक या दोघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.