पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार
केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 14 राज्यांना 5858 कोटी 60 लाख रुपये;
महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक सर्वाधिक 1 हजार 492 कोटी रुपयांचा अग्रिम
मुंबई:—- केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील 14 राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून 5 हजार 858 कोटी 60 लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 492 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.
नुकत्याच वितरीत झालेल्या निधीसह केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून संबंधित 21 राज्यांना यावर्षी आतापर्यंत एकूण 14 हजार 958 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही बाब आपत्ती निवारणाच्या कार्यात केंद्र सरकार राज्य सरकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचे दाखविणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी, आंध्रप्रदेशला 1036 कोटी, आसामला 716 कोटी, बिहारला 655 कोटी 60 लाख, गुजरातला 600 कोटी, तेलंगनाला 416 कोटी 80 लाख आणि पश्चिम बंगालला 468 कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे.