वनहक्क दावे मंजुरीत पालघर जिल्हा देशात अग्रस्थानी
पालघर दि 5 : अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत वनवासी अनुसूचित जमाती तसेच इतर पारंपारिक वनवासी यांचे हक्क निश्चीत करुन प्रदान करण्यात पालघर जिल्हा देशात तसेच राज्यातही प्रथम क्रमांकावर आला आहे.
पालघर जिल्हयात आजपर्यंत ५००६९ वैयक्तिक दावे मंजुर झाले असून त्यांचे क्षेत्र २९,७५०.९० हे. आर इतके आहे. संपुर्ण देशाचा विचार करता देशामध्ये एकुण २३.७१,९२१ इतके वैयक्तिक दावे मंजुर झाले असुन त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा १.९८.५०४ इतका आहे. त्यापैकी ५०,०६९ वैयक्तिक दाव्यांच्या मंजुरीसह पालघर जिल्हा देशात तसेच राज्यात वनहक्क दावे मंजुर करणेबाबत अग्रस्थानी आहे. प्रलंबीत वनहक्क दावे निकाली काढण्याचे कामकाज अंतिम टप्यात आहे. तसेच सामुहिक वनहक्क दावे- ४९८ मंजुर केले असून त्यांचे क्षेत्र २९.७६७.०५ हे. आर इतके मंजुर आहे.
वनवासी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी यांच्या उपजिवीकेचे व अन्न सुरक्षेची सुनिश्चती करतांनाच जैव विविधतेचा निरंतर वापर, संवर्धन आणि पारिस्थितीक समतोल राखण्याचे काम शासनाच्या निर्देशाप्रमाणे पालघर जिल्हा प्रशासन करीत असुन सर्व संबंधित घटकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.