गांधीजींचे विचार सर्वकालिक मार्गदर्शक ; शिवाजी विद्यापीठ आयोजित व्याख्यानात प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

गांधीजींचे विचार सर्वकालिक मार्गदर्शक ; शिवाजी विद्यापीठ आयोजित व्याख्यानात प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

गांधीजींचे विचार सर्वकालिक मार्गदर्शक

शिवाजी विद्यापीठ आयोजित व्याख्यानात प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

इचलकरंजी ता.५ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सामाजिक,राजकीय, आर्थिक ,सांस्कृतिक ,शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच विचारांतील आशय हा केवळ समकालासाठी नाही तर सर्वकालिक उपयुक्त आहे. सर्व पातळीवर सर्व प्रकारचे शोषण सुरू असताना गांधीजींच्या विचाराचा संदर्भ आज फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्य ,लोकशाही, सार्वभौमत्व ,स्वराज्य, ग्रामविकास ,आर्थिक सार्वभौमत्व ,शिक्षण, जात, धर्म, राष्ट्रीय एकात्मता ,समाज आणि संस्कृती अशा विविध विषयांवर त्यांनी केलेली मानवकेंद्रीत मांडणी ध्यानात घेऊन धोरणे आखली तर आणि तरच हा देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनवू शकतो. गांधी विचारांचे मारेकरीच जेव्हा त्यांचे अनुयायी असल्याचा आव आणतात तेव्हा तर प्रत्येक सजग नागरिकांनी गांधी विचार समजून घेतला पाहिजे. आणि समकालीन काळात त्याचा स्वीकार ,प्रसार व प्रचार केला पाहिजे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या दूरशिक्षणव ऑनलाईन केंद्र, राज्यशास्त्र व प्लेस मेंट सेल अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यानात ” महात्मा गांधींच्या विचारांतील समकालीन प्रस्तुतता ” या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी दूरशिक्षण व ऑनलाईन केंद्राचे संचालक डॉ.के. बी. पाटील होते. निमंत्रक डॉ.एस.डी.भोसले यांनी स्वागत केले तर डॉ. सी. ए. बंडगर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. संजय चोपडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले,गांधीजींच्या ग्राम स्वराज्याचा आशय आज हरवलेला आहे. लोकल टू ग्लोबल ऐवजी ग्लोबल टू लोकल असा झालेला आहे.त्यांचा नई तालीम मधील शैक्षणिक विचार देशाला महासत्ता बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल.व्यावसायिक शिक्षण,मोफत आणि सक्तीचे शिक्षण,मातृभाषेचे महत्व यासाठी गांधी आग्रह धरतात .शिक्षणातून नैतिकतेचा विकास झाला पाहिजे.त्यातून विद्यार्थ्याला जीवन शिक्षण मिळाले पाहिजे.याविचारांची समकालीन प्रस्तुतता मोठी आहे.गांधीजींचा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अतिशय महत्वाचा आहे.जाती-पाती नष्ट झाल्या पाहिजेत,आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत ही भूमिका महत्वाची आहे.समाज आणि संस्कृतीचा ही विचार त्यांनी मांडला.गांधीवादी ऐवजी अहिंसावादी हा शब्द गांधीजीनी महत्वाचा मानला. ही भूमिका जनतेत आजच्या काळात रुजविली पाहिजे.तत्वाविना राजकारण, शिलाविना शिक्षण, विवेकविना सुख, सचोटीविना व्यापार अशी काही राष्ट्रीय महापापे त्यांनी सांगितली. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात गांधी विचारांची धन्यवाद सर्वकालिका स्पष्ट केली.

डॉ. के.बी.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हणाले गांधीजींनी ग्राम विकास ,नई तालीम, नितीमत्ता,स्त्री-पुरुष समानता, अहिंसा. श्रम,स्वराज्य याबाबतचे मांडलेले विचार आजच्या समकालीन प्रस्तुततेत महत्वाचे आहे.आभार समन्वयक प्रा.डॉ.सूर्यकांत गायकवाड यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *