चार लाखांच्या गुटख्यासह सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
गुटखा वाहतूक करणाऱ्यास तावडे हॉटेल परिसरातून अटक
कोल्हापूर, दि.८ (प्रतिनिधी)
पुणे बेंगलोर हायवे वरील तावडे हॉटेल उड्डाणपूल नजीकच्या सर्विस रोडवर गुटख्याची वाहतूक करताना एकास पकडून ४ लाखांच्या गुटख्यासह ७ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. याबाबत रावत दुंडाप्पा उकली (वय ४२ रा. सोलगे मळा शहापूर ता. हातकणंगले,जि. कोल्हापूर याच्यावरती गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय सुत्राकडून अवैद्य गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने तावडे हॉटेल सर्विस रोडवर सापळा रचून मारुती सुझुकी कॅरी कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच ०९ -इ एम ३९५० या टेम्पोला पकडून त्याची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधी तंबाखू, सुपारी, असा ४ लाख ५ हजारांचा गुटखा मिळून आला. रावत उकली याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सागर चौगुले, यशवंत जाधव, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांनी केली.