१४ लाखाचा मुद्देमाल मद्यवाहनासह जप्त
एक्साईज कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाची कारवाई
अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. १० कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने १४ लाख २८ हजार ६०० रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा वाहनासह जप्त केला. ९ लाख ७८ हजार ६०० रुपयाचे मद्य असल्याचे कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम. मस्करे यांनी सांगितले.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर- नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथक १ ला राधानगरी – कोल्हापूर रोडवरुन एका चारचाकी सिल्व्हर कलरच्या जेनिओ वाहनातून अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने कोल्हापूर-राधानगरी रोड, क्रशर चौक, इरानी खान रंकाळा तलाव येथे सापळा लावून संशयित महिंद्रा कंपनीची जेनिओ नं. MH-07-P-4755 वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील हौदामध्ये गोवा राज्याची विदेशी मद्य व बिअरचे १८०, ५०० तसेच ७५० मिलीचे एकुण १५१ बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी प्रसाद महादेव नराम व.व. ५१, रा. घर नं- ११८४, मु.पो. फोंडाघाट, हवेली नगर, ता. कणकवली, जि. सिंधुदर्ग या आरोपीस अटक केली आहे. पकडण्यात आलेल्या जेनिओ मध्ये विदेशी मद्य व बिअर चा मद्यसाठा आढळून आला आहे. वाहनासह मद्याची किंमत १४ लाख २८ हजार ६०० रुपयांचे असून मद्याची किंमत ९ लाख ७८ हजार ६०० इतकी आहे. या गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आरोपी व्यतिरीक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का ? तसेच या मद्याचा कोठे पुरवठा करणार होता ? याबाबतचा तपास सुरु आहे. गुन्ह्यातील आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर व जवान विलास पवार, विशाल भोई, सचिन लोंढे, धीरज पांढरे, प्रसाद माळी, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे हे करत आहेत.