१० न
स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात महायुतीचे सरकार गरजेचे – शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे
आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना स्त्रियांचे जीवनमान उंचावणारे निर्णय
मुंबई दि.१०: स्त्री शक्ती केंद्रा मार्फत दिनांक १० नोव्हेंबर रोजी वरळी येथील आदर्श नगर येथे महिला मेळावा व हळदी कुंक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सांगितले की, स्त्रियांना संसार चालवताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकदा सणासुदीच्या दिवशी स्त्रियांना रेशन भरताना विचार करावा लागतो. यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील, रोजच्या जीवनात नित्य उपयोगी असणाऱ्या किराणाचे दर स्थिर राहावेत यासाठी प्रयत्न केले मात्र अनेक वर्ष रेंगाळत पडलेली ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने त्यांच्या विचाराचा गांभीर्याने विचार करून ‘आनंदाचा शिधा’ ही संकल्पना राज्यभर राबवली आणि सणासुदीच्या दिवशी गोरगरीब जनतेला मोफत शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा हा स्त्रियांना संसार चालवताना निश्चितपणे झाला आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून महिलांना आर्थिक बळ मिळावे याकरिता ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबविण्यात आली आणि त्यातून अनेक स्त्रियांचे जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लागला आहे. आगामी काळात देखील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राज्यभरात लागू करण्यात येतील त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला पुन्हा राज्याच्या सत्तेत बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यभरातून महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावेत असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.