अभिनव उपक्रम, डिजीटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अभिनव उपक्रम, डिजीटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शालेय शिक्षण विभागाचा आढावा.

अभिनव उपक्रम, डिजीटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा.

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. भविष्यकालीन धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाने अधिक जोमाने काम करावे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शाळा भेट उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे शालेय व्यवस्थापन, शिक्षणाचा दर्जा, मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा, शाळेतील भौतिक सुविधा याची माहिती नियमित मिळण्यास मदत होईल. हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवण्यात यावा. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे. शाळा आणि वसतीगृहांना अचानक भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथके करावीत.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला गुण असतात. त्यांना शालेयस्तरावरूनच वाव मिळाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रास मदत, सहकार्य करण्यासाठी काम करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्था इच्छुक आहेत. या व्यक्तींचे तसेच सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जावी. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घ्यावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता वाढीसाठी सांगली, सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल उपक्रमाची माहिती घ्यावी आणि हा उपक्रम राज्यात सुरू करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा निर्माण केली जाणार आहे. ही शाळा डिजिटल सुविधांनी परिपूर्ण करून शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभाग यासाठी आवश्यक साधने दिली जाणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *