मिती ग्रुप प्रस्तुत
साहित्य रंग
आजच्या काळातील लेखक आणि कवींसाठी हक्काचं डिजिटल व्यासपीठ
मुंबई दि.१०:- महाराष्ट्राला लेखनाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक प्रथितयश लेखकांचं साहित्य वाचत मराठी वाचकांच्या अनेक पिढ्या घडल्या. आजही ते साहित्य वाचलं जातं. परंतु आजच्या काळात लेखन करणारे लेखक आणि कवी यांचं साहित्य आजच्या पिढीसमोर सातत्याने यावं तसंच या सर्व लेखक, कवींना एकत्र करावं या उद्देशाने ‘साहित्य रंग’ हा उपक्रम आपण सुरु करत आहोत. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे डिजिटल व्यासपीठ उभं राहात आहे. यानिमित्ताने आजच्या काळातल्या सर्व साहित्यिकांना एकत्र आणणारा असा हा मंच ठरेल. या डिजिटल मंचावरून या सर्व लेखक आणि कवींचं साहित्य प्रसारित होणार असल्यामुळे सोशल मीडियावर हे कायम स्वरूपी राहील आणि याचा एक उत्तम दस्ताऐवज तयार होईल. सुरुवातीला महाराष्ट्रभरातील लेखक, कवी या कार्यक्रमात सहभागी होतील. नंतर टप्प्या टप्प्याने भारतातील आणि परदेशातीलही लेखक, कवींना या डिजिटल व्यासपीठावर सामावून घेतलं जाईल.
दर आठवड्याला शुक्रवारी, संध्याकाळी ७ वाजता याचा एपिसोड प्रसारित केला जाईल. या प्रत्येक एपिसोडमध्ये एक लेखक आणि एक कवी सहभागी होतील. विविध विषयांवरील त्यांचं निवडक लेखन आणि निवडक कविता या कार्यक्रमात सादर केल्या जातील. या माध्यमातून साहित्याचे विविध रंग वाचकांसमोर उलगडता येतील आणि पुढच्या पिढीलाही आजच्या काळातील साहित्याची ओळख करून दिली जाईल. या प्रत्येक कार्यक्रमात डॉ. नीलम गो-हे यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. त्या स्वतः उत्तम लेखिका असल्यामुळे आजच्या काळातल्या समग्र लेखनाचा आढावा देखील त्या वेळोवेळी घेतील.
अशा प्रकारच्या साहित्यविषयक व्यासपीठामुळे नवीन पिढीला देखील लेखनाची प्रेरणा मिळेल आणि वाचन संस्कृतीही वृद्धिंगत होईल.
निमंत्रक :
डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या
उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद
neeilamgorhe@gmail.com
x @neeilamgorhe