महान उर्दू कवी जगन्नाथ आझाद
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
इन्सानियत खुद अपनी निगाहो मे हैं जलील
इतनी बुलंदीयो पे तो इंसा न था कभी !
म्हणजे “माणुसकी आता आपल्या नजरेतून उतरू लागली आहे. कारण माणूस तेवढं टोक गाठेल अस तिला वाटलंच नव्हतं.” असे लिहिणारे
जगन्नाथ आझाद हे उर्दू साहित्यातील मोठ नाव. भारत सरकारच्या विविध खात्यात तीन दशके काम करणाऱ्या आझाद यांनी पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीतही मोहम्मद अली जिनांच्या आग्रहावरून लिहिले होते. अर्थात ते नंतर बदलले गेले.जीवन विषयक सखोल चिंतन असणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाचा जन्म ५ डिसेंबर १९१८ रोजी झाला आणि २४ जुलै २००४ रोजी ते कालवश झाले.
कवी ,शायर ,लेखक विचारवंत, पत्रकार, अधिकारी अशी विविधांगी ओळख असणाऱ्या जगन्नाथ आझाद यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील इसारवील येथे झाला. त्यांचे वडील तिलोकचंद हेही ख्यातनाम कवी , शायर होते. पंजाबी हिंदू असलेले हे कुटुंब फाळणी नंतर लाहोरहून दिल्लीला आले. हळव्या मनाच्या जगन्नाथ आजाद या तरुण कवीवर फाळणीचा मोठा परिणाम झाला. फाळणीमुळे सर्वसामान्य जनतेवर जो अन्य अत्याचार झाला त्यावर त्यांनी जश्न ए आजादी नावाची अठ्ठावीस शेरांची एक उत्तम गझलही लिहिली.
न पूछो जब बहार आई तो दिवाने को क्या गुजरी ?
जरा देखो की इस मौसम में फरजानो पे क्या गुजरी ?
कहो दैरो हरमवालो ! यह तुमने क्या फसू फुंका?
खुदा के घर पे क्या बीती ,सनम खालो पे क्या गुजरी ?
न पूछ आझाद अपनो और बेगानों का अफसाना
हुआ था क्या यह अपनोंको , यह बेगानो पे क्या गुजरी ?..
म्हणजे हे स्वातंत्र्य मिळाल आहे.पण फाळणी झाली आहे.ही बहार आली असल्यामुळे वेड्यांना काय आनंद झाला असेल ते बघू नका तर विचार करणाऱ्यांवर, बुद्धीप्रामाण्यावर, सदसदविवेकावर निष्ठा असणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे ते बघा.अरे धर्मवेड्यांनो मंदिर मस्जिदवाल्यानो तुम्ही कोणती काळी जादू केलीत ? बघा त्यामुळे प्रत्यक्ष अल्लावर,परमेश्वरावर काय वेळ आली आहे ? प्रेमभावनेवरच संकट ओढवले आहे.
असं लिहिणाऱ्या जगन्नाथ आझाद यांच्यावर उर्दू कवितेचे संस्कार आपल्या शिक्षक व कवी असणाऱ्या वडिलांकडूनच झाले होते.इसाखीलहून तिलोकचंद यांची बदली कलोकलोट या गावी असलेल्या शाळेत झाली.पाच वर्षाचे जगन्नाथ तेथे शिकू लागले. आठवीपर्यंत शिक्षण त्यांनी तेथे घेतले. नंतर दहावीपर्यंत ते मियांवली या गावी शिकले .महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते रावळपिंडीला आले. तेथे महाविद्यालयात त्यांना त्यांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व घडवणारे पोषक वातावरण मिळाले.या महाविद्यालयात त्यांनी बज्म ए अदब अर्थात साहित्य सभा सुरू केली. महाविद्यालयात शिकतानाच लाहोर मधून प्रकाशीत होणाऱ्या आदवी दुनिया आणि जमाना या साहित्य विषयक प्रतिष्ठित नियतकालिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे त्यांचे नाव हळूहळू उर्दू साहित्यात ओळखीचे होऊ लागले.
एक नया माहोल, एक ताजा समा पैदा करे
दोस्तों आवो,मोहब्बत की जुबा पैदा करे !
असं लिहिणाऱ्या जगन्नाथ आझादानी लाहोरच्या ओरिएंटल कॉलेजातून एम ए ची पदवी प्राप्त केली. याच काळात त्यांना डॉ. मोहम्मद इकबाल, सय्यद असबिल अली, अबिद सुखी गुलाम मुस्तफा, डॉ. सय्यद मोहम्मद अब्दुल्ला इत्यादी उर्दू साहित्यिकांशी परिचय झाला. त्यांच्यातील काव्यविषयक जाणीव आणि प्रगल्भता याच काळात समृद्ध होत गेली . फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष महंमद अली जिना यांनी त्यांना पाकिस्तानचे राष्ट्रगीत त्यांना लिहायला सांगितले. कारण एका पंजाबी हिंदूने पाकिस्तानचे राष्ट्रगीत लिहिले तर जगभर पाकिस्तान धर्मनिरपेक्ष देश आहे असा संदेश जाईल असे जिनांचे मत होते. म्हणूनच पाकिस्तानच्या सुरुवातीच्या काळात जगन्नाथ आझादानी लिहिलेले राष्ट्रगीतच म्हटले जायचे.जिनांच्या मृत्यूनंतर मात्र ते बदलून हाफिज जालंदरी यांनी लिहिलेले राष्ट्रगीत पाकमध्ये गायले जाई लागले.१३ ऑगस्ट १९५२ रोजी पाकच्या रेडिओवरून हाफिज जालंदरी ज्यांच्या राष्ट्रगीताचे पहिले प्रसारण झाले. हाफीज जालिंदरी यांचे मूळ नाव अब्दुल्ल हाफिज होते.१९०९ साली जन्मलेला हा कवी पंजाबच्या जालंदर मधील.फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले आणि वृद्धापकाळाने २१ डिसेंबर १९८७ रोजी कालवश झाले.त्यांनी इस्लाम धर्माचा ओवीबद्ध इतिहास तीन खंडात लिहिला आहे.आठ हजार ओळीच्या या काव्यामुळे त्यांना अबुल असर ही पदवी मिळाली होती.
किनारे ही से तूफा का तमाशा देखने वाले
किनारे से कभी अंदाज ए तुफा नही होता..
असं लिहिणाऱ्या जगन्नाथ आझाद यांनी विद्यार्थीदशेतच पत्रकारितेत प्रवेश केला होता.लाहोर इथून प्रकाशित होणाऱ्या अदाबी दुनिया या उर्दू मासिकाचे ते संपादक होते.फाळणी नंतर काही काळ दैनिक मिलाप चे ते सहसंपादक होते.पुढे १९४८ ते १९७७ अशी तीस वर्षे त्यांनी भारत सरकारच्या सेवेमध्ये विविध खात्यात काम केले. भारतीय प्रेस ब्युरोच्या दिल्ली आणि श्रीनगर कार्यालयात त्यांनी काम केले. भारत सरकारच्या मानव संसाधन विभागाच्या अंजुमन तरक्की उर्दू अर्थात उर्दू प्रोत्साहन विभागाचे ते १९८९ साली उपाध्यक्ष व १९९३ साली अध्यक्षही होते. निवृत्तीनंतर जम्मू विद्यापीठात उर्दू विभागाचे प्रमुखपदी त्यांनी काही काळ भूषवले. आझाद यांना शकुंतला आणि विमला या दोन पत्नीपासून पाच अपत्ये झाली.
एक नजर ही देखा था शौक ने शबाब उनका
दिन को याद है उनकी ,रात को है खाँब उन का
गिर गए निगाहों से फुल भी ,सितारे भी
मैने जब से देखा है, आलम ए शबाब उनका !
असं लिहिणारे जगन्नाथ आझाद तब्बल सत्तरावर पुस्तकांचे लेखक होते. कविता, गझल ,आत्मचरित्र, ललितबंध ,प्रवासवर्णन, वैचारिक अशा साहित्याच्या सर्व प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले.महंमद इकबाल यांच्यावर त्यांनी मोठे संशोधन केले.इकबाल मेमोरीयल ट्रस्टचे ते १९८१ ते ८५ या काळात अध्यक्षही होते. त्यांनी उर्दू आणि इंग्रजीत हे सारे लेखन केले. इकबाल :माइंड अँड आर्ट,आखे तरस्ती है , हयात ए मरहुम , पुष्किन के देश में, बेकरां,सितारों से जरॉ तक , जावीदा, कोलंबस के देश में यासारखी त्यांची अनेक पुस्तके अतिशय प्रसिद्ध आहेत. रशिया ,अमेरिका, युरोप ,ब्रिटन, कॅनडा, पाकिस्तान आदी अनेक देशातून त्यांनी प्रवास केला. साहित्यिक सांस्कृतिक आदान प्रदान केले.
अशा या माणसाला जम्मू-काश्मीर विद्यापीठांने डी.लिट.ने सन्मानित केले होते.भारत सरकार, पाकिस्तान सरकार, पंजाब सरकार , गालिब मेमोरियल ट्रस्ट, उर्दू सोसायटी ऑफ कॅनडा,चीनचे पेकिंग विद्यापीठ, जागतिक उर्दू अकादमी अशा अनेक देशानी ,संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. जीवन विषयक सखोल चिंतन असणाऱ्या मानवतावादी जगन्नाथ आझाद यांना विनम्र अभिवादन. एका कवितेत ते म्हणाले होते ,
वही मै हु जिसका हर एक शेर एक आरजू का मजार है
कभी वो भी दिन थे के जीन दिनो,मेरी हर गझल थी दुल्हन दुल्हन ,
ये जमी और उनकी वसीयते ,न मेरी बनी तेरी बनी
मगर इस पे भी मै यही जिद हमे, ये तेरा वतन ,ये मेरा वतन…..
तसेच जगन्नाथ आझाद यांचे काही शेर पुढीलप्रमाणे,
निंद क्या है जरा सी देर की मौत
मौत क्या है तमाम उम्र की निंद…
ढूँढने पर भी न मिलता था मुझे अपना वजूद
मैं तलाश-ए-दोस्त में यूँ बे-निशाँ था दोस्तो..
हम ने बुरा भला ही सही काम तो किया
तुम को तो ए’तिराज़ ही करने का शौक़ था..
बहार आई है और मेरी निगाहें काँप उट्ठीं हैं
यही तेवर थे मौसम के जब उजड़ा था चमन अपना..
इस से ज़ियादा दौर-ए-जुनूँ की ख़बर नहीं
कुछ बे-ख़बर से आप थे कुछ बे-ख़बर से हम…
फिर लौट कर गए न कभी दश्त-ओ-दर से हम
निकले बस एक बार कुछ इस तरह घर से हम..
कब इस में शक मुझे है जो लज़्ज़त है क़ाल में
लेकिन वो बात इस में कहाँ है जो हाल में ..
ये दुनिया है यहाँ हर काम चलता है सलीक़े से
यहाँ पत्थर को भी ला’ल-ए-गिराँ कहना ही पड़ता है
ज़बानों पर दिलों की बात जब हम ला नहीं सकते
जफ़ा को फिर वफ़ा की दास्ताँ कहना ही पड़ता है ..
जब अपने नग़्मे न अपनी ज़बाँ तक आए
तिरे हुज़ूर हम आ कर बहुत ही पछताए
बेगाना रहे दर्द-ए-मोहब्बत की दवा से
ये दर्द ही कुछ और सिवा छोड़ गए हम ..
क्या बेबसी है ये कि तिरे ग़म के साथ साथ
मैं अपने दिल में हूँ ग़म-ए-दौराँ लिए हुए
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)