आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांवर व्यवस्थापकीय संकट
नामांकित टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस वादाच्या चक्रव्युहात
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ला कधीकाळी नोकरीच्या स्थिरतेसाठी 'सरकारी नोकरी'चा दर्जा देण्यात आला होता. पण, आता भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएस एका मोठ्या वादाचे केंद्रबिंदू बनली आहे. टीसीएस सध्या मोठ्या अंतर्गत संकटाचा सामना करत आहे. दोन महिन्यांपूर्वी कंपनीने जागतिक स्तरावरील आपल्या एकूण कर्मचा-यांपैकी सुमारे २ टक्के म्हणजेच अंदाजे १२,००० कर्मचा-यांची कपात करण्याची घोषणा केली होती. आता या निर्णयाचे गंभीर परिणाम दिसू लागले असून, कर्मचा-यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कार्यालयांमधून अनेक कर्मचा-यांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. राजीनामा देण्यासाठी कर्मचा-यांवर पद्धतशीरपणे दबाव आणला जात आहे. अचानक नोकरीवरून काढून टाकने आणि मानवी संसाधन (एचआर) विभागाकडून छळ अशा गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. कंपनी या कपातीला "भविष्यासाठी तयार होणारी संस्था" बनवण्याचे पाऊल म्हणत असली तरी, कर्मचारी मात्र असुरक्षिततेची भावना अनुभवत आहेत. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वाढता वापर आणि अमेरिकेतील व्हिसा शुल्क वाढ यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असला तरी, याचा थेट फटका कर्मचा-यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थैर्याला बसत आहे.
सध्या आयटी क्षेत्रामध्ये भविष्याबद्दल चिंता आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टीसीएस आपल्या २ टक्के कर्मचा-यांना श्रीफळ देणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता २ महिन्यानंतर त्याचे परिणाम दिसत आहेत. टीसीएसकडून अनेक कर्मचा-यांना घरचा रस्ता दाखवला जात आहे. अनेक कर्मचा-यांना सक्तीने राजीनामा देण्यास भाग पाडत असल्याचे समोर आले आहे. कर्मचारी कपातीच्या वृत्तामुळे आयटी क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. टीसीएससारख्या मोठ्या आयटी कंपनीमध्ये कर्मचा-यांना सक्तीने राजीनामा देण्याची आणि नोकरीवरून काढून टाकण्याची लाट सुरू झाली. कर्मचा-यांवर एचआरकडून नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. कर्मचा-यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर भयान वास्तव मांडत आहे. त्या वास्तव्यात कर्मचा-यांच्या व्यथा अन् अडचणी दिसत आहेत. अचानक नोकरी गमावण्यामुळे वैयक्तिक आयुष्यात होणा-या गंभीर परिणामांवर कर्मचा-यांनी चिंता व्यक्त केली आहे.
टीसीएससारख्या मोठ्या कंपनीमध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप अनेक कर्मचा-यांनी केला आहे. कर्मचा-यांनी सोशल मीडियावर कंपनीतील अनुभव शेअर केले आहेत. टीसीएसमधून एका कर्मचा-याला कामावरून काढून टाकले. आपली नोकरी गेली, हे तो कुणाला सांगूही शकत नाही. तो आता बेरोजगार आहे. अचानक नोकरी गेल्याचे सत्य त्या तरुणाने अद्याप घरी सांगितलेलं नाही. तो अद्याप मानसिक तणावात अन् चिंतेत आहे. त्या तरुणाला एचआरने जबरदस्तीने राजीनामा दिला.
दुस-या एका कर्मचा-याने रेडिटवरील पोस्टमध्ये म्हटले, "मला राजीनामा देण्यास सांगितले. राजीनामा देण्यास मी नकार दिला. त्यांच्यासमोर मी रडत होतो. घाबरत मी त्यांना नोकरीवरून काढू नका अशी विनंती केली. टीसीएस ही माझी पहिली कंपनी आहे, असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी मला धमकी दिली. आम्ही नोकरीवरून काढून टाकल्यानंतर वाईट रिव्ह्यू देऊ असे मला धमकावले." त्यावर मीही म्हणालो, "ठीक आहे. तुम्हाला आवडेल तसं करा. मी काहीही केलं तरी राजीनामा देणार नाही." मी प्रचंड रडत होतो, घाबरलो होतो... मला नोकरी जाण्याची भीती वाटत होतीच. पण मी त्यावेळी खंबीर राहण्याचा प्रयत्न केला.
तिस-याने आपला अनुभव सर्वांसमोर ठेवत म्हटले की, टीसीएसमधील पॅनेल माझ्या राजीनाम्याची वाट पाहत होते. मी दररोज ७ ते ९ तास काम करतो. तरीही जवळच्या ठिकाणी रिपोर्टिंग का करतो? असा प्रश्न मला एचआरने विचारला. त्यावर मी म्हणालो की, आरएमजीने याबाबत मला कधीही काहीही सांगितले नाही. मला कोणताही मेल आलेला नाही. मी नेहमीच प्रत्येक कॉल, प्रत्येक मेल, प्रत्येक जीचॅट संदेश अटेंड केला. नेहमीच काम करतो, असे त्यांना सांगितले. माझ्या कुटुंबातील मी एकमेव कमावता आहे. नोकरी गेली तर लग्नही रद्द होईल, मला नोकरीवरून काढू नका, कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे, असे मी त्यांना विनवणी करून सांगितले. पण एचआरने मला राजीनामा देण्यास जबरदस्ती केली, असेही त्याने सांगितले. दरम्यान, माझीही नोकरी गेली आहे. मी सध्या बेरोजगार असून नोकरीच्या शोधात आहे. पण टीसीएसमधील अनुभवामुळे मला अपमानित अन् निराश वाटते.
चौथ्या कर्मचा-याने आपला अनुभव सांगितला. त्याने टीसीएसमध्ये १३ वर्षे काम केले होते. त्याला सुमारे पाच महिने सतत छळ आणि दबावाचा सामना करावा लागला. त्याचे प्रकल्प नाकारले गेले, धमक्या देण्यात आल्या आणि अखेरीस राजीनामा देण्यास सांगितले गेले. त्याने राजीनामा देण्यास नकार दिल्यावर त्याची नोकरी २०२५ च्या मध्यापर्यंत संपुष्टात आणली गेली. दहा वर्षांहून अधिक काळ ज्या टाटा ग्रुप कंपनीशी तो एकनिष्ठ राहिला, तिने त्याचा विश्वासघात केला." त्याला 'बेंच'वर असतानाच्या कालावधीसाठी ६-८ लाख रुपये परत करण्यास सांगितले गेले. ही रक्कम त्याच्या ग्रॅच्युइटी आणि सुट्ट्यांच्या पैशांतून कापली गेली आणि उर्वरित रक्कम टीसीएसने वसूल केली. एकेकाळी मोठ्या प्रकल्पाचा भाग असलेला तो सध्या बेरोजगार असून, तो आपल्या पत्नी आणि मुलांना अजूनही सत्य सांगू शकलेला नाही.
इतर कर्मचा-यांनीही अशाच तक्रारी केल्या आहेत. त्यांना अचानक एचआरकडून फोन येतात, त्यांच्या सिस्टीमचा ॲक्सेस काढून घेतला जातो किंवा 'मूनलायटिंग'चे (एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणे) खोटे आरोप केले जातात. अनेक कर्मचा-यांच्या म्हणण्यानुसार, टीसीएसचे व्यवस्थापक एक गोपनीय 'फ्लुइडिटी लिस्ट' ठेवतात. ज्या कर्मचा-यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे, त्यांची नावे त्यात असतात. त्या कर्मचा-यांना स्वेच्छेने राजीनामा देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाते, अन्यथा त्यांना काढून टाकले जाते.
एका वर्तमान कर्मचा-याने कंपनीतील भीतीचे वातावरण सांगितले. तो म्हणाला, "एकामागून एक टीम पूर्णपणे काढून टाकल्या जात आहेत... नवीन तंत्रज्ञानावर काम करणारे लोकही सुरक्षित नाहीत." ८-१० वर्षांचा अनुभव असलेले सहकारीही अचानक कामावरून काढले जात आहेत. कर्मचा-यांच्या या स्पष्टीकरणावरून या निर्णयामुळे केवळ आकडेवारीवर नाही तर कर्मचा-यांच्या मानसिक आणि आर्थिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. नोकरी गमावलेले अनेक मध्यम स्तरावरील व्यावसायिक अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत, कारण सध्या आयटी क्षेत्रात भरती थांबली आहे. सध्या तरी, भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीत भीतीचे वातावरण आहे आणि कर्मचारी स्वतःला विचारत आहेत, "पुढचा नंबर कुणाचा आहे?"
जुलै महिन्यात टीसीएसने या नोकरकपातीचा निर्णय धोरणात्मक बदल असल्याचे स्पष्ट केले होते. एआय, ऑटोमेशन आणि डिजिटल परिवर्तनाकडे कंपनी वळत असल्याने काही भूमिका अनावश्यक झाल्या आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने म्हटले, "ज्या कर्मचा-यांची नियुक्ती शक्य नाही, त्यांना आम्ही कामावरून कमी करत आहोत." या २ टक्के कपातीचा सर्वाधिक परिणाम मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचा-यांवर होण्याची शक्यता आहे, विशेषतः जे जास्त काळ 'बेंच'वर होते. या नोकरकपातीवर अनेक आयटी कर्मचारी संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या कपातींना 'अपारदर्शक' आणि 'अनैतिक' म्हटले आहे.
टीसीएसमधील ही कपात भारतातील २५० अब्ज डॉलर्सच्या आयटी क्षेत्रातील मोठ्या अनिश्चिततेच्या लाटेचा भाग आहे. जागतिक तंत्रज्ञान खर्चातील घट आणि एआयमुळे पारंपरिक भूमिकांची मागणी कमी होणे, ही प्रमुख आवाहने आहेत. इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएलटेक सारख्या इतर कंपन्यांनीही खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण टीसीएसची कृती, तिचे मोठे प्रमाण आणि प्रक्रियेतील गुप्ततेमुळे वेगळी ठरते. तज्ञांच्या मते, या नोकरकपाती आयटी उद्योगातील कायमस्वरूपी संरचनात्मक बदलाचे संकेत आहेत. कौशल्य विकास महत्त्वाचा ठरणार असून, एआय आणि क्लाउड भूमिकांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरणा-या मध्यम स्तरावरील कर्मचा-यांना अधिक धोका आहे.
टीसीएसने काहीही स्पष्टीकरण दिलं असलं तरीही टीसीएसच्या जगभरातील सुमारे १२,००० कर्मचा-यांच्या नोक-यांवर गदा आली आहे, जी कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी कपात ठरली आहे. टीसीएसने कर्मचारी कपात केल्यावर नोकरदारांच्या जीवाला घोर लागला आहे. ज्यापैकी बहुतेक मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचारी आहेत. कंपनीने अलीकडेच नफ्यात ६ टक्के वाढ नोंदवली असताना कंपनीने कर्मचा-यांना अखेरचा ‘टाटा’ करायचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच नफा वाढत आहे, परंतु नोक-या कमी होत आहेत, हा विरोधाभास लोकांना त्रास देत आहे. तर दुसरीकडे सीईओ के कृतिवासन यांच्या वार्षिक उत्पन्नावर तीव्र टीका उमटल्या आहेत.
टीसीएसचे सीईओ के कृतिवासन यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मिळालेल्या एकूण पगारात १.३९ कोटी रुपये मूळ वेतन, २.१२ कोटी रुपये भत्ते आणि सुमारे २३ कोटी रुपये कमिशनचा समावेश आहे. हा पगार टीसीएसच्या कर्मचा-यांच्या पगारापेक्षा ३३० पटीने जास्त आहे. कृतिवासन व्यतिरिक्त टीसीएसचे माजी सीईओ आणि कार्यकारी संचालक एनजी सुब्रमण्यम यांना मे २०२४ पर्यंत ११.५५ कोटी रुपये पगार मिळाला होता, त्यानंतर कंपनीतील पदांवरून पायउतार झाले. यामध्ये ३० लाख मूळ वेतन, फायदे, भत्ते आणि भत्त्यांमध्ये ७.२४ कोटी आणि कमिशन म्हणून ४ कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी, टीसीएसचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना २.१ लाख रुपये सिटिंग फी मिळाली पण त्यांना कोणतेही कमिशन मिळाले नाही. नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर केकी मिस्त्री यांना एकूण ३.०६ कोटी मानधन मिळाले, ज्यामध्ये ३ कोटी रुपये कमिशन आणि ५.७ लाख रुपये सिटिंग फी चा समावेश आहे.
टीसीएस सीईओंच्या पगारावर एक्स वापरकर्ते संतापले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, 'सीईओचा पगार २.५ कोटींवरून ३ कोटी झाला, काही फरक पडला नाही... पण १५ लाखांच्या पॅकेजच्या तुलनेत १२,००० लोकांचे शून्य उत्पन्न त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करेल.’ दुस-याने असा उपहास केला की कंपनीला भविष्यासाठी तयार करायचे असेल तर १२,००० लोकांचे बलिदान देणे आवश्यक आहे. कंपनीचे ‘आरोग्य’ माणसांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.
टीसीएस सारख्या स्थिर कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या टाळेबंदीने संपूर्ण आयटी क्षेत्राला विचार करायला भाग पाडले आहे. टीसीएस सामान्यतः भारतीय आयटी क्षेत्राचा मजबूत आधारस्तंभ मानला जातो आणि नोकरीच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारी नोकरीच्या बरोबरीचा मानला जायचा. पण, आता अलिकडेच झालेल्या टाळेबंदीच्या घोषणेमुळे आयटी उद्योगात खळबळ उडाली असून लोकांचाही भ्रमनिरास होऊ लागला आहे. टीसीएस मधील संभाव्य ताळेबंदीचा परिणाम मध्यम ते वरिष्ठ पातळीच्या कर्मचा-यांवर होईल. यासोबतच काही कनिष्ठ कर्मचा-यांवरही याचा परिणाम होऊ शकतो जे बराच काळ ‘बेंच’वर आहेत म्हणजेच कोणत्याही प्रकल्पावर सहभाग नाहीत. आता कंपनी चपळ व उत्पादन-केंद्रित दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहे. या बदलात पूर्वीसारखे बहुस्तरीय नेतृत्वाची आता गरज नाही, ज्यामुळे प्रकल्प आणि कार्यक्रम व्यवस्थापनासारख्या जुन्या भूमिका कमी होत आहेत.
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९