‘पत्रकार दर्पण’ दिवाळी अंकाच्या विक्रीतून पूरग्रस्तांना मदत; मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य निर्णय
मुंबई : ज्येष्ठ पर्यावरणवादी पत्रकार अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते ‘पत्रकार दर्पण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न; अनेक नामवंत साहित्यिकांचे लेखन.
मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघाचा बहुप्रतिक्षित ‘पत्रकार दर्पण’ दिवाळी अंक २०२५ नुकताच प्रकाशित झाला. ज्येष्ठ पर्यावरणवादी पत्रकार अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते पत्रकार भवन येथे या अंकाचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाच्या सभागृहात अनेक नामवंत पत्रकार, लेखक आणि संपादक उपस्थित होते.
या प्रकाशन सोहळ्यादरम्यान, मुंबई मराठी पत्रकार संघाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपणारा निर्णय जाहीर केला. ‘पत्रकार दर्पण’ या दिवाळी अंकाच्या विक्रीतून होणारा संपूर्ण नफा महाराष्ट्रातील अलीकडील पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. संघाच्या कार्यकारीणीने हा ठराव एकमताने मंजूर केला असून, पत्रकार संघाच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अंकाची वैशिष्ट्ये आणि मान्यवर लेखकांची मांदियाळी
यंदाच्या ‘पत्रकार दर्पण’ दिवाळी अंकाचे संपादन कार्यकारी संपादक शैलेंद्र शिर्के यांनी केले असून, अंकाची पृष्ठरचना स्नेहल मसुरकर यांनी केली आहे. या अंकात साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर लेखकांचे मौलिक साहित्य वाचायला मिळणार आहे.
अंकात समाविष्ट असलेले काही प्रमुख लेखक व पत्रकार:
सारंग दर्शने, सुधीर जोगळेकर, श्रीकांत बोजेवार, जयंत माईणकर, दिवाकर शेजवळ, संजीवनी खेर, योगेश त्रिवेदी, प्रसाद काथे, अनिकेत जोशी, शुभदा चौकर, अभय जोशी, जॉन कोलासो, प्रसाद मोकाशी, संदीप प्रधान, प्रशांत पवार, संतोष प्रधान, रवींद्र बिवलकर, हर्षल प्रधान, राही भिडे, संदीप चव्हाण, राजेंद्र हुंजे, स्वाती घोसाळकर, आत्माराम नाटेकर, डॉ. सुरेशचंद्र वैद्य, दिनेश गुणे, नितीन सप्रे, दिलीप चावरे, दिलीप ठाकूर, सतीश केंगार, जगदीश भोवड, ना. म. हरळीकर, मंगेश विश्वासराव, भगवान निळे, श्रीकांत आंब्रे, राजेश दाभोळकर, विजय तारी, राजेंद्र साळसकर, मदन बडगुजर, किरीट गोरे, विनोद पितळे, देवेंद्र भुजबळ, प्रा. हेमंत सुधाकर सामंत, राजू वेर्णेकर, घनश्याम भडेकर, संदीप द. बोडके.
याव्यतिरिक्त, विवेक मेहेत्रे यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांनी अंकाला विनोदाचा हलकाफुलका रंग चढवला आहे, तर राजेश खाडे यांच्या ‘वारीच्या वाटेवर…’ या संवेदनशील फोटोस्टोरीने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पत्रकार संघाने सामाजिक जाण आणि साहित्यिक मूल्यांची उत्तम सांगड घालून प्रकाशित केलेल्या या अंकाला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा अंक ऑनलाईन विक्रीसाठी ॲमेझॉनवर आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील पेपर स्टॉल्सवर उपलब्ध आहे.
Posted inमुंबई
पत्रकार दर्पण’ दिवाळी अंकाच्या विक्रीतून पूरग्रस्तांना मदत; मुंबई मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य निर्णय
