कोल्हापूर: पोलिसांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; ‘अट्रॉसिटी’सह चौकशीची मागणी
पोलिस कॉन्स्टेबल सुशील गायकवाडवर मारहाणीचा आणि गैरवर्तनूकचा गंभीर आरोप; शाहूपुरी पोलिस ठाण्यातील प्रकार
कोल्हापूर: दिवाळीच्या खरेदीवरून परतणाऱ्या १९ वर्षीय शालेय विद्यार्थ्याला एका पोलिस कॉन्स्टेबलने कोणताही गुन्हा नसताना बेदम मारहाण केल्याची आणि नंतर त्याला पोलिस ठाण्यात फरपटत नेल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. मारहाण करणारे पोलिस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड हे साध्या वेशात होते, तसेच त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवरही बोट ठेवण्यात आले आहे.
मारहाण झालेले विद्यार्थी चैतन्य मुकेश संनदे (रा. ई वॉर्ड, सदराबझार, कोल्हापूर) यांनी स्वतः पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली असून, कॉन्स्टेबल गायकवाड यांच्यावर ‘अट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांच्या ‘अवैध’ संपत्तीची व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय घडली?
- दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०:०० वाजता चैतन्य संनदे हे दिवाळीच्या कपड्यांची खरेदी करून राजारामपुरीहून आपल्या घरी परतत होते.
- दाभोळकर कॉर्नरजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दुचाकीला अडथळा आणल्याने चैतन्य यांनी त्या व्यक्तीला जाब विचारला.
- यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलिस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड यांनी कोणताही विचार न करता चैतन्य यांना कॉलर पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली.
- चैतन्य यांनी विनवणी करूनही गायकवाड यांनी त्यांना शिवीगाळ करत डोके, छाती आणि पोटावर मारहाण केली.
- मारहाण करताना कॉन्स्टेबल सुशील गायकवाड हे गणवेशात नव्हते. मारहाणीनंतर त्यांना फरपटत शाहूपुरी पोलिस ठाण्यात नेण्यात आले, जिथेही शिवीगाळ सुरूच होती, असे चैतन्य यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ
घटनेची माहिती मिळताच चैतन्य यांचे वडील मुकेश संनदे हे रात्री १०:३० वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोहोचले. - त्यांनी गंभीर मारहाणीबद्दल कॉन्स्टेबल गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
- रात्री ११:३० वाजता पोलिस निरीक्षकांनी त्यांना आधी सी.पी.आर. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेण्यास सांगितले.
- वैद्यकीय अहवाल घेऊन पहाटे ३:३० वाजता परत आल्यावर, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली, असा आरोप २ संनदे कुटुंबीयांनी केला आहे.
- त्यानंतर पहाटे ४:०० वाजता कंट्रोल रूममध्ये संपर्क साधल्यावर तेथील अधिकारी देसाई आणि कॉन्स्टेबल पिंगळे यांनी फोनवरून पोलिस ठाण्याला तक्रार नोंदवण्याबाबत सूचना केली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय एफआयआर दाखल होणार नाही, असे सांगत अधिकाऱ्यांनी केवळ लेखी अर्ज स्वीकारला.
- पहाटे ५:२० वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला, तसेच ११२ या क्रमांकावरही घटनेची माहिती देण्यात आली आहे.
▪️कॉन्स्टेबलवर गंभीर आरोप आणि जीविताला धोका
तक्रारीमध्ये कॉन्स्टेबल सुशील गायकवाड यांच्यावर केवळ सध्याच्या घटनेचाच नव्हे, तर त्यांच्या मागील कार्यशैलीवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. - गायकवाड यांनी यापूर्वीही अनेक व्यक्तींना विनाकारण मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- हुपरी पोलिस ठाण्यातून त्यांची गगनबावडा येथे बदली झाली असूनही, ते परिसरात अवैध धंद्यांसाठी (जुगार, गुटखा, दारू तस्करी, मसाज पार्लर आणि वेश्याव्यवसाय) खंडणी गोळा करतात, असे तक्रारीत म्हटले आहे.
- ते क्वचितच गणवेशात दिसतात आणि ‘चित्रपटातील पोलिसांप्रमाणे’ कायद्याची पर्वा न करता लोकांवर क्रूर हल्ला करतात, असा आरोप आहे.
- सीसीटीव्ही फुटेज तपासावीत, त्यात गायकवाड गणवेशात नसल्याचे दिसेल, असेही चैतन्य सांडे यांनी नमजू केले आहे.
विद्यार्थी चैतन्य संनदे यांनी जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे आणि ‘जर मला काही झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सुशील गायकवाड यांची असेल,’ असे म्हटले आहे.
मागणी:
पीडित विद्यार्थ्याने पोलिस अधीक्षकांना विनंती केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, पोलिस कॉन्स्टेबल सुशील गायकवाड यांच्यावर ‘अट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या संशयास्पद खात्यांची तसेच अवैध व्यवहारांची कसून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.