🛑 थरारक! शाहुवाडीतील वृद्ध कंक दांपत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी केला छडा; एका आरोपीला अटक!
▪️प्रतिकूल परिस्थितीत कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल
कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहुवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील दुर्गम भागातील निनाई परळी गोळवण वस्ती येथे वृद्ध कंक दांपत्याच्या दुहेरी खुनाची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अखेर गुन्ह्याची उकल केली असून, एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश मिळवले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १९/१०/२०२५ रोजी कंक दांपत्याचा मुलगा सुरेश कंक हा त्यांच्या आई-वडिलांची विचारपूस करण्यासाठी वस्तीवर गेला होता. त्यावेळी त्याला सौ. रखुबाई निनु कंक (वय ६५ वर्ष) यांचा मृतदेह वस्तीशेजारील गवतामध्ये आणि निनु यशवंत कंक (वय ७० वर्ष) यांचा मृतदेह वस्तीशेजारील डॅमच्या पाण्याच्या काठावर सडलेल्या अवस्थेत दिसून आला.
सुरुवातीला हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्याचा संशय
मृतदेहांची अवस्था पाहता, प्रथमदर्शी हा मृत्यू हिंस्त्र श्वापदाने केलेल्या हल्ल्यात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार, शाहुवाडी पोलीस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मयत नोंद (रजि. नं. ७७/२०२५ व ७८/२०२५) दाखल करण्यात आली होती.
समांतर तपासातून घातपाताची शक्यता बळावली
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकास समांतर तपास करण्याचे निर्देश दिले.
- या पथकाने घटनास्थळ परिसराची छाननी केली असता, हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यास दुजोरा मिळाला नाही.
- तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि संशयीत हालचालींच्या पडताळणीअंती वृद्ध दांपत्याचा घातपात झाल्याच्या शक्यतेस बळकटी मिळाली.
- त्यानुसार, दि. ३०/१०/२०२५ रोजी शाहुवाडी पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (गुन्हा रजि. नं. ३३३/२०२५, भारतीय न्याय संहितेचे कलम १०३(१), २३८) दाखल करण्यात आला.
सराईत गुन्हेगार निष्पन्न; आंबा येथून अटक
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला या गुन्ह्यात विजय मधुकर गुरव, रा. शिरगाव, ता. शाहुवाडी या पोलीस अभिलेखावरील सराईत पाहिजे असलेल्या गुन्हेगाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी विजय गुरवला आंबा, ता. शाहुवाडी येथून ताब्यात घेण्यात आले.
आश्रयाच्या वादातून दुहेरी खून
गुन्ह्याप्रकरणी कसून चौकशी केली असता, आरोपी विजय गुरव याने गुन्ह्याची कबुली दिली. - कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी तो मागील काही दिवसांपासून डोंगर कपारीतून आपले अस्तित्व लपवून वावरत होता.
- याच हेतूने तो निनाई परळी येथील गोळवण वस्तीवर आला आणि त्याला वृद्ध कंक दांपत्य एकटे राहत असल्याचे दिसले.
- त्याने त्यांच्याकडे आश्रय आणि जेवणाची व्यवस्था पुरवण्याची गळ घातली.
- मयत निनु कंक यांनी यास विरोध केल्याने त्यातून चिडून आरोपीने लाकडी दांडके व दगडाने सौ. रखुबाई निनु कंक आणि निनु यशवंत कंक यांचा खून केल्याची कबुली दिली.
आरोपीस पुढील तपासकामी शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी विभाग, कोल्हापूर श्री. आप्पासाहेब पवार हे करत आहेत.
या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीवर कोल्हापूर आणि नजीकच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
👮 तपास पथकातील अधिकारी व अंमलदार 🚔
कोल्हापूर पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हा गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणला:
मुख्य तपास अधिकारी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा):
- सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ
पथकातील इतर सदस्य: - पोलीस उपनिरीक्षक श्री. शेष मोरे
- पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे
- पोलीस अंमलदार राम कोळी
- पोलीस अंमलदार सुरेश पाटील
- पोलीस अंमलदार रुपेश माने
- पोलीस अंमलदार विनोद कांबळे
- पोलीस अंमलदार राजेंद्र वरंडेकर
- पोलीस अंमलदार अमित सर्जे
गुन्ह्याचा पुढील तपास करणारे अधिकारी (शाहुवाडी विभाग): - उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार

