डॉक्टर आत्महत्या प्रकरण: निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने ‘पोलीस खात्यातून बडतर्फ’
नैतिक अधःपतन, दुर्वर्तन आणि पदाचा गैरवापर केल्याचा ठपका; कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांची मोठी कारवाई
फलटण : येथील बहुचर्चित डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. सुनील फुलारी यांनी भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये ४ नोव्हेंबर २०२५ पासून ही मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे.
फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३४५/२०२५ मधील गुन्हातील आरोपी असलेल्या बदनेवर बेफिकिरी, नैतिक अधःपतन, दुर्वर्तन आणि विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे.
कारवाईचे कारण:
बदनेने पोलीस दलाचे संपूर्ण ज्ञान असूनही समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल असे वर्तन केले. त्याचे कृत्य पोलीस उपनिरीक्षक पदास अत्यंत अशोभनीय आहे आणि त्याने कर्तव्य पालनात तसेच दैनंदिन जीवनात संशयास्पद वर्तन करून घृणास्पद आणि निंदनीय कृती केली आहे. सार्वजनिक व लोकहिताच्या दृष्टिकोनातून बदनेला यापुढे शासकीय सेवेत ठेवणे उचित ठरणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.बडतर्फीचा हा आदेश ४ नोव्हेंबर २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील एका गंभीर गैरवर्तनाच्या प्रकरणावर निर्णायक तोडगा निघाला आहे आणि खाकी वर्दीची प्रतिमा जपण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
