कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ६० किलो चांदीच्या जबरी चोरीचा १२ तासांत छडा, ७ आरोपींना अटक
नारायण कांबळे
कोल्हापूर: प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वडगाव येथे महामार्गावर बस अडवून ६० किलो चांदी आणि सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह सात आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नेमकी घटना काय?
२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी मछिंद्र नामदेव बोबडे हे ‘न्यू अंगडिया सर्व्हिस’चे ६० किलो चांदी, १० ग्रॅम सोने आणि मशिनरी पार्ट घेऊन बसने (MH 09 GJ 7272) कोल्हापूरहून मुंबईकडे निघाले होते. तावडे हॉटेल येथून बसमध्ये चढलेल्या तीन इसमांनी वाठार येथे क्लिनरला कोयत्याचा धाक दाखवून बस थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर इतर साथीदारांनी दुचाकीवरून येत फिर्यादीला मारहाण करून सर्व मुद्देमाल लुटून नेला होता.
तपासाची चक्रे आणि अटक
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. पोलिसांनी कोल्हापूर बस स्टँड ते किणी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गोपनीय माहितीच्या आधारे विक्रमनगर येथील अक्षय बाबासाहेब कदम (३१) याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता चोरीचा सर्व माल मिळून आला.
अक्षयने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी टेंबलाई मंदिर परिसरात सापळा रचून त्याच्या अन्य ६ साथीदारांना अटक केली:
१. जैद बशीर अफगाणी (२१, रा. उचगाव)
२. अमन लियाकत सय्यद (२१, रा. विक्रमनगर)
३. सुजल प्रताप चौगले (२०, रा. सांगली)
४. आदेश अरविंद कांबळे (१८, रा. सांगली)
५. अदिनाथ संतोष विपते (२५, रा. सांगली)
६. सैफू बशीर अफगाणी (रा. उचगाव – क्लीनर)
चोरीचे कारण
प्राथमिक तपासात आरोपींनी मौजमजेसाठी आणि कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील तपास वडगाव पोलीस ठाणे करत आहे.
सहभागी पथक:
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी केली.
