अमोल कुरणे
कोल्हापूर, दि.२४ (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क कागल विभागीय पथकाने राधानगरी तालुक्यातील दाजीपूर येथे संशयास्पद हालचालीवरून दुचाकी स्वाराची तपासणी केली. यावेळी एक लाख साठ हजाराचा मुद्देमाल मद्य,वाहनासह जप्त करून संशयीतास ताब्यात घेण्यात आले.
राज्य उत्पादक शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त विजय चिचांळकर, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या आदेशाने कागल एक्साईज निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या मार्गदर्शनाने कागल पथक २ चे दुय्यम निरीक्षक रमेश चंदुरे यांनी ३१ डिसेंबर व नववर्षाच्या निमित्ताने देवगड-निपाणी राज्यमहामार्गावर गोवा बनावटीचे मद्य दाजीपूर (ओलवण) गावच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या तपासणी नाका क्र. २ येथे वाहन तपासणी करत असताना राधानगरीच्या दिशेने संशयित टीव्हीएस जुपिटर एम एच झिरो नाईन एच बी ६५२० दुचाकीवरील बॅगेमध्ये व डिकीमध्ये गोवा बनावटीची ओल्ड मंक रमच्या २४० बाटल्या असा एकुण रु. १,५९,८०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी युवराज विलास नलावडे व.व.५०, (रा.शाहू मिल कॉलनी, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क कागल निरीक्षक एस.एस.आंबेरकर, दु. निरीक्षक रमेश चंदुरे, जवान अमर पाटील, ऋषिकेश कांबळे यांनी केली.
गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रमेश चंदुरे करत आहेत.
