नारायण कांबळे इचलकरंजी (प्रतिनिधी):
इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पूर्णपणे हस्तगत करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० ते २:१५ च्या सुमारास फिर्यादी सौ. कांचन संजय कांबळे (वय ५०, रा. टाकवडे, ता. शिरोळ) या इचलकरंजी ते पुणे बसमध्ये बसल्या असताना ही चोरी झाली होती. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन संशयित महिला आरोपींनी त्यांच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ८४५/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची कारवाई आणि अटक
गुन्ह्याचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीद्वारे धागेदोरे मिळाले. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून खालील दोन महिलांना ताब्यात घेतले:
१) गीता दयानंद चौगुले (वय ५५, रा. आळते, ता. हातकणंगले)
२) दिपाली आकाश लोंढे (वय २७, रा. शिरोळ)
पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत दोन्ही महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने, ज्याची किंमत ३ लाख ४५ हजार रुपये आहे, ते जप्त करण्यात आले आहेत.
तपास पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, प्रवीण साने, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुनील बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, गणेश सनदी, विकास चौगुले, गजानन बरगाले यांनी सहभाग घेतला.
सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून, अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे त्यांनी केले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
