दत्तवाड कर्मचाऱ्यासाठी गाव ‘बंद’, मग गंभीर पाणी प्रश्नावर ‘आंदोलनाचे’ अस्त्र का उपसत नाही?

दत्तवाड कर्मचाऱ्यासाठी गाव ‘बंद’, मग गंभीर पाणी प्रश्नावर ‘आंदोलनाचे’ अस्त्र का उपसत नाही?

दत्तवाड कर्मचाऱ्यासाठी गाव ‘बंद’, मग गंभीर पाणी प्रश्नावर ‘आंदोलनाचे’ अस्त्र का उपसत नाही?

​कोल्हापुर (प्रतिनिधी):
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे सध्या दोन भिन्न चित्र पाहायला मिळत आहेत. एका बाजूला ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण व्यापारी असोसिएशन आणि ग्रामस्थांनी गुरुवारी ‘कडकडीत बंद’ पाळून आपली एकजूट दाखवली. मात्र, याच वेळी दुसरीकडे रणरणत्या उन्हात दूधगंगा नदी कोरडी पडल्याने शेती आणि पशुधनाचा जीव टांगणीला लागला असताना, या गंभीर पाणी प्रश्नावर गाव एकत्र येऊन ‘बंद’ किंवा ‘आंदोलनाचे’ अस्त्र का उपसत नाही? असा जळजळीत सवाल आता परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमधून विचारला जात आहे.
​एकीकडे ‘बंद’चा यशस्वी प्रतिसाद, दुसरीकडे पाणी प्रश्नाचे ‘मरण’
​नळ पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी नरेंद्र कासार यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दत्तवाडमधील बाजारपेठ, हायस्कूल रोड, बसस्थानक परिसर आणि सरकारी दवाखाना परिसर पूर्णपणे बंद होता. पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांनीही भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात गाव एकवटले, ही कौतुकास्पद बाब असली तरी, “आमच्या शेतीचं काय? आमच्या तहानलेल्या जनावरांचं काय?” हा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.

​दूधगंगा खोऱ्यातील भीषण वास्तव: ‘टेल-एंड’चा शाप की प्रशासकीय दुर्लक्ष?
​दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील महाराष्ट्राचे शेवटचे गाव. काळमवाडी धरणातून सुटलेले पाणी दत्तवाडपर्यंत पोहोचेपर्यंत वाटेतच उपसा होतो किंवा बाष्पीभवनामुळे ते आटून जाते.

​नदीची सद्यस्थिती: १९ मार्चपासून आज अखेर नदीपात्र पूर्णपणे कोरडे ठाक पडले आहे.
​पिकांचे नुकसान: उसाची भरणी (Earthing up) झाली आहे, पण पाणी नसल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत.

​पशुधनाचे हाल: नदी कोरडी असल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे.

​अडचण ‘बर्गे’ची की ‘इच्छे’ची?
​दत्तवाड-एकसंबा या बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. येथील बर्गे (पाणी अडवण्याच्या पाळ्या) इतके जीर्ण झाले आहेत की, धरणातून आलेले पाणी थांबण्याऐवजी गळती होऊन कर्नाटकच्या दिशेने वाहून जाते.तर दत्तवाड – मलिकवाड नविन बंधाऱ्याचे काम संथ गतीने सुरु आहे .
​”एका कर्मचाऱ्यासाठी जर अख्खं गाव बंद होऊ शकतं, तर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी आपण आक्रमक का होत नाही?” असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.
​सुळकुड योजना आणि प्रदूषणाचे दुहेरी संकट
​एकीकडे हक्काचे पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे ‘सुळकुड-कोगनोळी योजने’द्वारे दूधगंगेचे पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे. साखर कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत आहे. या सर्व विषयांवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ आश्वासने देत आहेत.
​आता वेळ आली आहे ‘पाण्यासाठी’ लढण्याची!
​दत्तवाडमधील पाणी टंचाई ही केवळ नैसर्गिक नसून ती व्यवस्थापकीय दिरंगाईचे फळ आहे. कर्मचाऱ्याला न्याय मिळायलाच हवा, पण तहानलेल्या शेतीला आणि जनावरांना न्याय कधी मिळणार?

​शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा:
जर येत्या काही दिवसांत नदीला पाणी सुटले नाही आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा ठोस निर्णय झाला नाही, तर केवळ कर्मचाऱ्यासाठीच नव्हे, तर “पाण्यासाठी दत्तवाड बंद” करण्याची वेळ येईल, असा इशारा शेतकरी वर्गातून दिला जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *