विश्व नवकार महामंत्र: विश्वाच्या कल्याणाचा अथांग स्त्रोत
लेखिका: डॉ. रिता मदनलाल शेटीया
(संस्थापिका, रिता इंडिया फाउंडेशन)
संपूर्ण विश्वात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण करण्याची अलौकिक शक्ती ज्या मंत्रात सामावलेली आहे, तो म्हणजे ‘नवकार महामंत्र’. येत्या ९ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण भारतात आणि जगातील १०८ देशांमध्ये “विश्व नवकार महामंत्र दिवस” मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनीही १०८ गुणांना नमन करणाऱ्या या मंत्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हा केवळ जैन धर्माचा मंत्र नसून, तो मानवतेचा आणि वैश्विक गुणांचा सन्मान करणारा महामंत्र आहे.
१. मंत्राचा उगम आणि अलौकिक रचना
नवकार महामंत्र हा अनादि काळापासून अस्तित्वात असलेला एक प्रभावी आणि वैश्विक मंत्र आहे. या मंत्राची रचना कोणत्याही व्यक्तीने केलेली नसून तो शाश्वत मानला जातो.
- अक्षरांची शक्ती: या मंत्रात एकूण ६८ अक्षरे आहेत. पहिल्या पाच ओळींत ३५ आणि शेवटच्या दोन ओळींत ३३ अक्षरे आहेत. ही ६८ अक्षरे ६८ तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाइतकी पवित्र मानली जातात.
- भाषा: हा मंत्र मूळ प्राकृत भाषेत आहे, जी सर्वसामान्यांची भाषा मानली जात असे.
२. पंचपरमेष्ठी: गुणांची उपासना
नवकार मंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला किंवा देवाला नव्हे, तर ‘गुणांना’ वंदन केले आहे.
- नमो अरिहंतानम्: ज्यांनी काम, क्रोध, लोभ यांसारख्या शत्रूंना जिंकले आहे, अशा अरिहंतांना नमस्कार.
- नमो सिद्धानम्: ज्यांनी अष्टकर्मांचा नाश करून मोक्ष मिळवला आहे, अशा सिद्धांना नमस्कार.
- नमो आयरियाणम: जे स्वतः पंचमहाव्रतांचे पालन करतात आणि शिष्यांना मार्ग दाखवतात, अशा आचार्यांना नमस्कार.
- नमो उवज्जायानम्: जे धर्मग्रंथांचे अध्यापन करतात, अशा उपाध्यायांना नमस्कार.
- नमो लोए सव्हसाहुनम: जगातील सर्व निःस्वार्थ साधू आणि संतांना नमस्कार.
- आंतरिक शांती: या मंत्राच्या ध्वनीलहरींमुळे मनाला विलक्षण शांती मिळते आणि मानसिक तणाव दूर होतो.
- दुःखाचे निवारण: मंत्राच्या प्रभावाने तीव्र दुःख देखील सुई टोचल्यासारखे सौम्य भासते.
- आध्यात्मिक प्रगती: हा मंत्र व्यक्तीला अहंकारापासून दूर नेऊन आत्मशुद्धीकडे वळवतो.
- वैश्विक दृष्टीकोन: हा मंत्र कोणत्याही जात, पंथ किंवा धर्मापुरता मर्यादित नाही. तो सर्वांसाठी खुला असलेला ‘अपराजित’ मंत्र आहे.
