मोठी कारवाई! भाताच्या कोंड्यात लपवून चाललेली गोवा बनावटीची दीड कोटींची दारू जप्त
हिमाचल प्रदेशच्या दोघांना अटक; राज्य उत्पादन शुल्क कागल विभागाची हणबरवाडी येथे कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी):
गोव्याहून मध्यप्रदेशकडे तस्करीच्या उद्देशाने नेली जाणारी १ कोटी २२ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) कागल विभागाच्या पथकाने जप्त केली. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरील हणबरवाडी येथे सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालक आणि क्लीनर अशा दोघांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तस्करीची मोडस ऑपेरंडी
तस्करांनी पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ट्रकचा वापर केला होता. ट्रकमध्ये वरच्या बाजूला भाताचा कोंडा भरून त्याखाली दारूचे बॉक्स अत्यंत शिताफीने लपवले होते. ही दारू केवळ मध्यप्रदेशात विक्रीसाठी अधिकृत असताना, तिची विनापरवाना वाहतूक कोल्हापूरमार्गे पंजाबच्या दिशेने सुरू होती.
अटक केलेले आरोपी
१. भरत सुखराम गुरंग (वय ३३, रा. मसली, जि. सिमला, हिमाचल प्रदेश)
२. सुनीलकुमार प्रेमसिंह ठाकुर (वय ३२, रा. केंद्रोरा, जि. सिमला, हिमाचल प्रदेश)
असा लागला छडा
कागल विभागाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, गोव्यातून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा तस्करी केला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने हणबरवाडी येथे सापळा लावला. संशयास्पद ट्रक थांबवून तपासणी केली असता, त्यात १८० मि.ली. च्या तब्बल ६०,९६० बाटल्या (१,२७० बॉक्स) सापडल्या. जप्त केलेल्या दारूची किंमत १ कोटी रुपये असून, २२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १.२२ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, कोल्हापूर विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात निरीक्षक शंकर आंबेरकर, दुय्यम निरीक्षक प्रशांत नागरगोजे, रमेश चंदूरे, दिनकर गवळी तसेच जवान सचिन काळेल, अमर पाटील, लक्ष्मण येडगे व केतन दराडे यांचा समावेश होता. जवान सचिन काळेल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, निरीक्षक शंकर आंबेरकर अधिक तपास करत आहेत.
