कागल एक्साईज इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर यांची ताडी माफियांवर धडक कारवाई
इनोव्हातून भेसळयुक्त ताडीची तस्करी उधळली, लाखोंचा मुद्देमाल जप्त
अमोल कुरणे
कोल्हापूर,दि.११ (प्रतिनिधी)
राज्य उत्पादन शुल्क विभाग, कागल विभागाचे इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धडाकेबाज कारवाईने ताडी माफियांचे कंबरडे मोडले आहे. भेसळयुक्त ताडीची अवैध वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत आंबेरकर यांनी पुन्हा एकदा आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली.
दि. ९ जून रोजी सकाळी ७.२० वाजता कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत ते लक्ष्मी टेकडी मार्गावर हॉटेल पल्लवीसमोर ही कारवाई झाली. इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर यांना मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीनुसार, एमएच-०९-एव्ही-९३९३ क्रमांकाच्या पांढऱ्या इनोव्हा गाडीतून मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त ताडीची विनापरवाना वाहतूक होणार होती.
माहिती मिळताच आंबेरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता दुय्यम निरीक्षक सुधीर भागवत, वाय. एस. शिर्के, जवान लक्ष्मण येडगे, कॉन्स्टेबल सचिन काळेल यांच्यासह तातडीने सापळा रचला. दोन खासगी वाहनांच्या मदतीने संशयित वाहनाचा माग काढत नाकाबंदी करून गाडी अडवली व झडती घेतली असता लाखोंची भेसळयुक्त ताडी आढळून आली.
कागल तालुक्यात अवैध दारू व भेसळयुक्त ताडीच्या व्यवसायाने डोके वर काढले असताना इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर यांच्या या धडक कारवाईमुळे माफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा आंबेरकर यांनी दिला. पुढील तपासअंती त्यांच्या तत्परतेमुळे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून शंकर आंबेरकर यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारीच समाजातील विषारी दारू, ताडीच्या विळख्यातून तरुणाईला वाचवू शकतात, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
ही कारवाई अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात इन्स्पेक्टर शंकर आंबेरकर यांच्यासह विष्णु भागवत, वाय.एस. शिर्के व जवान लक्ष्मण येडगे, कॉन्स्टेबल सचिन काळेल यांनी मोलाची कामगिरी बजावली.
पुढील तपास सुरु असून अवैध मद्य व्यवसायाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे कागल विभागाने स्पष्ट केले आहे.
