१० लाखांचा मुद्देमाल चंदगड तालुक्यात मद्यवाहनासह जप्त
एक्साईज शिनोळी सीमा तपासणी नाक्याची कारवाई

अमोल कुरणे
कोल्हापूर, दि. २४ (प्रतिनिधी)
गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणला जाणारा मोठा विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्काच्या शिनोळी सीमा तपासणी नाक्यावरील पथकाने जप्त केला आहे. पार्ले गावच्या हद्दीत तिलारी-मोटणवाडी रस्त्यावर रचलेल्या सापळ्यात सोनेरी रंगाची स्विफ्ट डिझायर कार पकडण्यात आली असून, वाहनासह एकूण १० लाख ३ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने २४ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. संशयित एम एच ०२ डी जी ९३०४ स्विफ्ट डिझायर कारची तपासणी केली असता, त्यात विविध ब्रँडच्या गोवा बनावट विदेशी मद्याचे ४३ बॉक्स आढळून आले. यात ३ लाख ५३ हजार ८८० रुपये किमतीची दारू आणि ६ लाख ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण १० लाख ३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कारचालक मूसा अब्दुलरजाक जमादार (रा. कोरोची, ता. हातकनंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, आर. सी. केरीपाळे, जी. एल. राणे तसेच जवान भरत सावंत, राहुल शिंदे, किरण बागुल, ऋषिकेश इंगळे, संदीप चौगुले, तुषार पवार, अविनाश परीट आणि महिला जवान स्वप्नाली बेडगे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे करत आहेत.

