द
हातकणंगलेत २१ लाखांच्या अवैध मद्यसाठ्यासह ‘इनोव्हा’ जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाची धडक कारवाई; सांगलीतील चालकाला अटक
विशेष प्रतिनिधी अमोल कुरणे

कोल्हापूर, दि. ३०: गोवा बनावटीच्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका इनोव्हा क्रिस्टा कारसह तब्बल २१ लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने जप्त केला. हातकणंगले हद्दीतील कोल्हापूर-सांगली महामार्गावर सापळा रचून ही धडक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील चालकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-सांगली मार्गावरून अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने हातकणंगले हद्दीत नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान, संशयास्पद वेगाने येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कारला (क्र. MH 10 DQ 2727) थांबवून झडती घेतली असता, वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत विविध नामवंत कंपन्यांच्या ७५० मि.ली. च्या १६८ सिलबंद बाटल्या आणि १८० मि.ली. च्या ७२० सिलबंद बाटल्या असा एकूण २ लाख ९९ हजार ५२० रुपयांचा दारूचा साठा हस्तगत करण्यात आला. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली १८ लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कार असा एकूण २० लाख ९९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाहनचालक उमेश महादेव घाटगे (वय ४४, रा. नरघोल वस्ती, कवठे महांकाळ, जि. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्यवंशी व कोल्हापूर विभागीय उपायुक्त स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, एस. पी. डोईफोडे, तसेच जवान राजेंद्र कोळी, मारुती पोवार, विशाल आळतेकर आणि राहुल कुटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. पी. डोईफोडे करत आहेत.
