विटा येथील यंत्रमाग कामगार राजेंद्र दिवटे यांना १३.२० लाख रुपयांची भरपाई मिळावी; जिल्हाधिकाऱ्यांचे संजय कदम यांच्याकडून वसुलीचे आदेश
विटा/सांगली:
न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विटा येथील यंत्रमाग मालक संजय कदम यांच्याकडून कामगार राजेंद्र दिवटे यांची थकीत पगाराची १३ लाख २० हजार ७९२ रुपये इतकी रक्कम महसूल अधिनियमातील नियमांनुसार वसूल करण्याचे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार सध्या विटा तहसीलदार कार्यालयामार्फत वसुलीची कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिवटे हे २०१६ पर्यंत संजय कदम यांच्या यंत्रमाग कारखान्यात कार्यरत होते. दिवटे यांनी किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याची मागणी केली असता, मालक संजय कदम यांनी सूडबुद्धीने त्यांना डिसेंबर २०१६ मध्ये कामावरून काढून टाकले होते. याविरोधात दिवटे यांनी न्यायालयात धाव घेत पूर्ववत कामावर घेणे आणि थकीत पगार किमान वेतनानुसार मिळण्याची मागणी केली होती.
कामगार न्यायालयाने दिवटे यांच्या बाजूने निकाल देऊनही मालकाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी रक्कम वसुलीसाठी प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले. यानंतर २५ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने विटा तहसीलदारांना ही रक्कम महसूल वसुली नियमानुसार संजय रामचंद्र कदम यांच्याकडून वसूल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियनच्या वतीने किमान वेतन कायदा आणि औद्योगिक विवाद अधिनियमांतर्गत ही कायदेशीर लढाई लढण्यात आली.
महाराष्ट्रातील ५ लाख यंत्रमाग कामगारांचे शोषण – कॉ. शंकर पुजारी
या प्रकरणी बोलताना महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात सध्या ५ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग कामगार कार्यरत आहेत. सर्वच ठिकाणी मालक कामगारांकडून दररोज सक्तीने १२ तास काम करून घेतात, परंतु ८ तासांचे लागू असलेले किमान वेतनही दिले जात नाही.”
त्यांनी पुढे गणित मांडताना सांगितले की, ८ तासांच्या कामासाठी सध्या १७,५८२ रुपये किमान वेतन आहे. दररोज १२ तास काम केल्यास अतिरिक्त ४ तासांच्या ओव्हरटाईमचे १७,५८२ रुपये मिळून एकूण प्रतिदिन १,३५२ रुपये म्हणजे महिन्याला सुमारे ३५ हजार रुपये पगार मिळणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. मात्र, राज्यभरात एकाही यंत्रमाग कारखान्यात याची अंमलबजावणी केली जात नाही. तसेच १० पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या कारखान्यांमध्ये ई.एस.आय. (ESI), पी.एफ. (PF) आणि पेन्शन यांसारख्या सामाजिक सुरक्षांचा लाभ दिला जात नाही.
दिवाळीला ७० हजार रुपये बोनस व सुट्ट्यांच्या पगाराची मागणी
आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युनियनने सर्व यंत्रमाग कामगारांसाठी एका महिन्याचा पगार बोनस आणि एका महिन्याचा पगारी रजेचा पगार असा एकूण २ महिन्यांचा पगार (किमान ७०,००० रुपये) देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही यंत्रमाग कामगाराची कामाबाबत काहीही तक्रार असल्यास त्यांनी महाराष्ट्र लाल बावटा जनरल कामगार संघटनेशी ९९६०४९९३६६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही कॉ. शंकर पुजारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
