२ अवैध मद्य वाहनासह १२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त
एक्साईज कोल्हापूर विभागीय भरारी पथकाची कारवाई; तिघांवर गुन्हा
कोल्हापूर, दि.६ (प्रतिनिधी)
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने छापा मारून उचगाव (तालुका करवीर) हद्दीत कारवाई केली असून २ वाहने आणि दारूच्या साठ्यासह एकूण १२ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागीय उपआयुक्त स्नेहलता नरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार यांच्या पथकाने जवान मारुती पोवार यांना मिळालेल्या माहितीनुसार उचगावच्या हद्दीत सापळा रचला.
यावेळी महिंद्रा कंपनीची झिओ ईव्ही (एमएच ५१ सी १९०७), आणि मारुती स्विफ्ट (एमएच ०९ ईयू ८४६३) या २ वाहनांची तपासणी केली असता, यामध्ये गोवा बनावटीचा १ लाख ८० हजाराचा बेकायदेशीर मद्यसाठा हस्तगत करण्यात वआला. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली १० लाख ५० हजारची २ वाहनेही जप्त केली.
या प्रकरणी सूर्यकांत वाघमारे, रणवीर सुनील सूर्यवंशी (वय २१ , रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) आणि दिलीप शिवाप्पा दोडमनी (वय २२ वर्षे, रा. स्टेशन रोड, शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे, आर. एम. पाटील, एस. पी. डोईफोडे, जवान मारूती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, दिपककुमार कापसे, राहुल कुटे यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक वाय. एन. फटांगरे करत आहेत.
चौकट
प्रभारी विभागीय उपायुक्त स्नेहलता श्रीकर-नरवणे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून अवघ्या दहा दिवसांत राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय भरारी पथकाने बेकायदेशीर दारू तस्करांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. जवान मारुती पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तावडे हॉटेल परिसरात धडक कारवाई करत पथकाने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठा हस्तगत केला. गेल्या १० दिवसांत एकूण ४ वाहने जप्त करून लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकाच्या या धडक कारवायांमुळे महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडण्यापासून वाचला असून, राज्य उत्पादन शुल्काच्या उत्पन्नात मोठी भर पडली आहे.
