MPSC व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी):
कोल्हापूर जिल्ह्यातील MPSC व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्या व प्रमुख मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) कोल्हापूर शहराच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
परीक्षेच्या प्रक्रियेतील वाढती अनिश्चितता, रखडलेली पदभरती, वाढता आर्थिक भार तसेच प्रशिक्षण व फेलोशिपच्या मर्यादित संधींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा केवळ परीक्षा आणि नोकरीचा प्रश्न नसून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या:
१. MPSC अध्यक्षांचा राजीनामा: MPSC च्या अध्यक्षांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.
२. पारदर्शक नेमणूक: विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच स्वच्छ प्रतिमेच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात यावी.
३. ऑफलाईन परीक्षा: MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात.
४. वार्षिक कार्ड प्रणाली: राजस्थान सरकारच्या धर्तीवर १०० रुपयांच्या कार्डवर वर्षभरातील सर्व परीक्षा घेण्याची सोय उपलब्ध करून द्यावी.
५. ७० हजार पदे भरती: येत्या काही दिवसांत ७० हजार पदांची भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी.
सदरील निवेदनाची तातडीने दखल घेऊन ते मा. मुख्यमंत्री, संबंधित विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगापर्यंत पोहोचवून कालबद्ध निर्णयासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी रोहित पाटील (युवक जिल्हाध्यक्ष), गणेश नलवडे (विद्यार्थी शहर अध्यक्ष), मोहन कांबळे (पदवीधर संघटक), पल्लवी भोसले (शहर युवती अध्यक्ष), प्रेम भोसले (जिल्हा कार्याध्यक्ष युवक) आणि निकिता माने (युवती जिल्हाध्यक्षा) यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
