युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांची बंदुकधारी पोलिसांकडून छळ

युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांची बंदुकधारी पोलिसांकडून  छळ

युक्रेन-रशिया युध्दाचे गंभीर परिणाम आता भारतालाही सोसावे लागत आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांचा छळ करण्यात आला आहे. युक्रेनमधून हजारो लोक पोलंडमध्ये प्रवेश करत आहेत. मात्र केवळ युक्रेनच्या लोकांनाच प्रवेश दिला जात असून भारतीय विद्यार्थ्यांना वेगळे काढून बंदुका आणि लाथाबुक्क्यांनी पोलिसांकडून बेदम मारहाण केली जात आहे. त्याचबरोबर सीमा ओलांडण्यासाठी युक्रेनच्या पोलिसांकडून लाच मागितल्याच्या तक्रारीही विद्यार्थी करत आहेत. या सर्व प्रकारामुळे भारतीय विद्यार्थांचे अक्षरशः हाल झाले आहेत. एका विद्यार्थीनीने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावर ओढवलेली ही भीषण परिस्थिती समोर आणली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील साक्षी इजनकर या विद्यार्थीनीने ही माहिती दिली. साक्षीने म्हटले की, उणे 15 डिग्री सेल्सिअस तापमानात जेव्हा आम्ही युक्रेनच्या सीमेवर पोलंडला जाण्यासाठी पोचलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला घेरले. आम्हाला सीमेवर प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी गेटही बंद करुन ठेवला होता. फक्त युक्रेन नागरिकांनाच पोलीस आत सोडत होते. आम्ही त्यांना विनंती केली. त्यानंतर त्यांनी पहिले भारतीय विद्यार्थीनींना प्रवेश दिला. त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यार्थ्यार्ंना बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पोलिसांनी भारतीय विद्यार्थ्यांना टॉर्चरही केले. त्यानंतर रात्री सुमारे 12 च्या सुमारास मुलांना प्रवेश दिला. त्यावेळी आम्ही खुप घाबरलेलो होतो. आत प्रवेश केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला चार लाईन्स करायला सांगितले. त्यानुसार आम्ही चार लाईन्समध्ये उभे राहिलो. नंतर त्यांनी तीन लाईन्स करायला सांगितले. आम्ही चार लाईन्स केल्या होत्या. त्यामुळे त्यांनी बंदुका घेऊन आम्हाला मारहाण केली. व्हिसा मिळवण्यासाठी आत गेलो तेव्हा तेथे पोलीस बंदुका आणि रॉड हातात घेऊन उभे होते.

आतमध्ये गेल्यावर व्हिसाबाबत हंटर गेम खेळायचा होता. तो काय खेळ असतो ते मला माहिती नव्हते. तिथे गेल्यावर ते रॉड आणि बंदुका घेऊन उभे होते. हा खेळ खेळल्यावर तुम्हाला व्हिसा मिळेल असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलगा आहे की मुलगी आहे हेही पाहिले नाही, असेही साक्षी इजनकरने म्हटले आहे. पोलिसांनी मारहाणीसोबतच मुलांचा छळही केला. ज्यांना अस्थमाचा त्रास होता त्यांना मारहाण करून त्यांना कसा श्वास घेता येत नाही असे दाखवल्याचे ती म्हणाली.

युक्रेनप्रमाणे रोमानियातही अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. 10 ते 15 किलोमीटर पायपीट करुन भारतीय विद्यार्थी सीमा गाठत आहेत. मात्र त्यांनाही सीमेवर कित्येक तास बसवून ठेवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर होत आहेत. आम्हाला येथे कुणीही विचारत नाही. आम्ही दुपारपासून निघालो आहोत. मात्र कुणीच आमच्याशी संपर्क साधलेला नाही. यापेक्षा मरण आलेले बरे. आम्हाला सुरक्षित आणण्यासाठी फक्त चर्चाच होत आहेत, असेही विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *