मुंबई : थंडी उलटून मुंबईत आता सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. मे महिन्याहून अधिक उकाडा मार्च महिन्याच्या मध्यावरच जाणवत आहे. मुंबईसह उपनगरांत सकाळी 11 वाजताच उन्हाने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. त्यातच आता सौराष्ट्र, कच्छमध्ये वाढलेले तापमान आणि उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणार्या उष्ण वार्यांमुळे पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 40 अंशांच्या वर जाण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच नागरिकांना मे महिन्याहून अधिक उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
हवामान विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 14, 15, 16 मार्च रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा समान प्रभाव जाणवणार आहे. 14 आणि 15 मार्चला सर्वाधिक जास्त उष्णता असेल तर 16 मार्चला तुलनेने कमी उष्णता असली तरी सतर्क राहावे. पुढील दोन दिवस म्हणजेच 17 आणि 18 मार्च रोजी वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज सर्वाधिक उष्णता जाणवेल तर 15 आणि 16 मार्चलाही तुलनेने कमी पण नेहमीपेक्षा अधिक उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्येही इतर जिल्ह्यांप्रमाणे वातावरण पुढील काही दिवस कोरडे असेल, असा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीही एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, येत्या दोन दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39 अंश राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. नागरिकांनी शरीराच्या पाणी पातळीत वाढ करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, शनिवारी उन्हाच्या कडाक्यामुळे मुंबईकरांचच्या अंगाची लाहीलाही झाल्याचे दिसून आले होते. शनिवारी मुंबईचे तापमान 38.9 अंश इतके होते. हे तापमान राज्यातील सर्वाधिक तापमान ठरले होते. आज मुंबईत 35 अंश इतके तापमान होते. तर रायगड येथे आज कमाल तापमान 38 अंशावर पोहोचले होते. तर किमान तापमान 22 अंशावर होते. वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणार्या पदाथार्र्ंकडे वळवल्याचे दिसून येत आहे.