मुंबई : 100 कोटी वसुली आणि मनी लॉड्रिंगप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यांनी आपल्या जामीनासाठी केलेला अर्ज आज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना आता आणखीन काही दिवस तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 29 डिसेंबरला ईडीने देशमुख आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले.
20 मार्च 2021 ला मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळविण्यासाठी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात 27 जानेवारी रोजी अर्ज करण्यात आला. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर त्यांंनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अनिल देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात ईडीने 7 हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले असून अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.