चिपळूण : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारने आकसाने बजावलेल्या नोटीसीचा चिपळूण येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोेंदवून त्याची होळी करण्यात आली आणि संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिली.
राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. आज प्रत्येक जिल्ह्यात नोटीशीची होळी केली जाणार असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यानुसार चिपळूण येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नोटीशीची होळी करुन आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नागेश धाडवे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, संदेश भालेकर आदी उपस्थित होते. आपले नेते देवेेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आम्ही सर्वच जण ठाम उभे आहोत, अशी ग्वाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.