रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थानच्या वार्षिक शिमगोत्सवास काल पासुन हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सुरवात झाली आहे. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केले जाते. यामध्ये पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम, नवस बोलणे-फे डणे यांसारखे कार्यक्रम होतात. तसेच नमनाचा सांस्कृतिक कार्यक्रमही होतो.
शिमगोत्सवाची सुरूवात पालखी सजवून,सुशोभित करून, देवाला रूपे लावून पालखी दर्शनाणे झाली. नंतर श्रींची पालखी खेळविण्यासाठी मंदिराबाहेर आणून पहाटे पर्यंत खेळविण्यात येऊन पहाटे श्रींची पालखी मांडावर स्थानापन्न करण्यात आली. आज सायंकाळी नियोजित ठिकाणाहून श्रींची होळी आणून मांडावर उभी करणे. त्यानंतर रात्रीपर्यंत होळीजवळ नवस बोलणे व फेडणे कार्यक्रम,पाली गावच्या सुप्रसिध्द नमनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी, दि.17 मार्च रोजी दु.२ ते सायं.७ वा.पर्यंत नियोजित ठिकाणाहून श्रींची कोकड होळी घेवून येणे. रात्री ९ ते १० वा. कोकड होळी खेळविणे व मोडणे. रात्री १० वा. पौर्णिमेचा होम होईल. १०.३० वा. पाथरट गावच्या सुप्रसिध्द नमनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवार, दि.18 मार्च रोजी स.९ वा. धुळवड कार्यक्रम होईल.
याप्रमाणे शिमगोत्सवाचे नियोजन करण्यात आले असून, शिमगोत्सव शांततेत पार पाडावा व सर्व भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य मानकरी व देवस्थानचे अध्यक्ष संतोष नारायण सावंतदेसाई (खोत) यांनी केले आहे.