रत्नागिरी : तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. एलईडी लाईटच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या मासेमारीला तात्काळ बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने राज्याच्या जलधी क्षेत्रात होणारी पर्ससीन मासेमारी 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या कालावधीत बंद केली आहे. तसे आदेश जिल्ह्यातील मत्स्य आयुक्तांना दिलेले असूनसुदा रत्नागिरी मिरकरवाडा मासेमारी बंदरातून राजरोसपणे पर्ससीन मासेमारी केली जात आहे. याबाबत आम्ही सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय , रत्नागिरी यांचे निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत. आपल्या कार्यालयात आमच्या विविध संघटनांनी लेखी निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेली आहेत. तरी देखील सध्या राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने एल . ई . डी . लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात सुमारे ६०० से ७०० नौका पर्ससीन मासेमारी करीत आहेत असे म्हटले आहे.
तसेच सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे आम्ही पुराव्यासह राज्य शासनाचे कायदे धाब्यावर बसवून मासेमारी सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी व तात्काळ पर्ससीनच्या सहाय्याने होणारी तसेच एल. ई . डी . लाईटच्या सहाय्याने होणारी मासेमारी बंद करून नौकांवरती त्वरित शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई व्हावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
आज पारंपरिक मच्छिमारांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या नौका जिल्ह्यातल्या बंदरात बंद अवस्थेत उभ्या आहेत . आम्ही दि . २४ जानेवारी रोजी मत्स्य आयुक्त यांचे कार्यालयात मासेमारी करत असलेल्या नौकांची नावे , नंबर दिलेले आहेत. त्या अगोदर १ जानेवारी पासून २४ जानेवारी पर्यंत त्यांनी ४३ पर्ससीन नौकांवर कारवाई केल्याचे आम्हाला सांगितले आहे, परंतु ती कारवाई कोणत्या स्वरुपात केली त्याची माहिती आम्हाला त्यांनी आजतागायत दिलेली नाही.
त्यांनी पुढे निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक उलाढाल करून या नौकांना मत्स्यव्यवसाय खात्याकडून नौका सुरु करण्यासाठी संरक्षण दिले जाते . त्यांची बंदरात नांगरून ठेवलेल्या असलेबाबत कोणताही पुरावा यांचेजवळ नाही आणि ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे . दि . १५/३/२०२२ नंतर आमचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कारण भाड्याने ट्रॉलींग मासेमारी करणाऱ्या नौका घेउन त्यांचेवरती एल . ई . डी . लाईट लावण्यासाठी मोठा जनरेटर ठेवून ( २५ ते ४० केव्ही ) व त्या नौकेवरती सुमारे १५ ते २० लाखाचे लाईट ( बल्ब ) लावून माशांना आकर्षित करून सुमारे १२ ते १३ वाव पासून मासेमारी केली जाते याचे पुरावेही आम्ही त्यांना दिलेले आहेत. तरीही होणारी राक्षसी पद्धतीची लुटमार न थांबल्यास होणारे परिणाम यास सर्वस्वी जिल्हा प्रशासन , सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे जबाबदार असतील याची नोंद आपण घ्यावी असे रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेचे अध्यक्ष विशाल मुरकर यांनी म्हटले आहे.