सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स्वाती श्रीकांत पाटील (वय 22 )असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती श्रीकांत पाटील व सासरे पाटील या दोघा विरोधात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माढामधील कुर्डू गावातील स्वातीच लग्न श्रीकांत पाटील यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच पती व सासरा यांनी विवाहीतेला माहेरी जाऊ नये , माहेरच्या लोकांशी संपर्क करु नये, यासाठी शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून स्वाती हिने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्येची घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सासरच्यांचा विरोधात बाबासाहेब भालचंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत मयत विवाहीतेचे पती श्रीकांत राजाभाऊ पाटील व सासरे राजाभाऊ पाटील रा.कुर्डू यांच्या विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व सहा.पो.निरीक्षक विक्रांत बोधे यांनी भेट दिली.सदर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.