भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न – आदिती तटकरे

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न – आदिती तटकरे

अलिबाग : जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते.  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नात्याने माझ्याकडून आणि शासनाकडून निश्चितच केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज महाड येथे केले. माणसाला माणूस म्हणून जगता यावे, त्याला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, हा संदेश चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिला गेला. म्हणून चवदार तळे हा ऊर्जास्तोत्र आहे, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज चवदार तळे सत्याग्रहाचा 95 वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा करण्यात आला, त्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चवदार तळे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, दि.20मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमधील  चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला. तो केवळ अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून देण्यासाठी दिलेला लढा नव्हता तर त्यांच्या मूलभूत न्याय्य हक्कासाठी दिलेला लढा होता. जुलै 2021 महिन्यात आलेल्या महापुरात चवदार तळेही वाचले नाही.  त्यानंतर चवदार तळ्याची साफसफाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाड नगरपालिका व ठाणे महानगरपालिकेचे मोठे योगदान होते. चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी जी यंत्रणा बसविण्यात आली आहे, त्याचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लवकरच केले जाणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *