मुंबई :- राज्यात एकीकडे भाजप महाविकास आघाडीला खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे तर दुसरीकडे ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वपक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. इम्तियाज जलील यांच्या या ऑफरनंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता या चर्चेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी एक भन्नाट कविता करत एमआयएमला खास सल्लाही दिला आहे. यावेळी त्यांनी महत्त्वाचं म्हणजे एमआयएमला एकट्याच्या बळावर लढण्याचा सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी आहे. शरद पवारांपर्यंत हा निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. इम्तियाज जलील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीच उधाण आले. पण शिवसेना नेते, मुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडूनही युतीबाबत साफ नकार देण्यात आला. ज्यानंतर आता रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.